

ग्राउंड रिपोर्ट----------लोगो
-rat१३p११.jpg-
26O43194
राजापूर ः पावसाळ्यामध्ये दरडी कोसळून अशाप्रकारे रस्ता बंद होतो.
-------
अणुस्कूरा घाटासाठी ‘मास्टर प्लॅन’ राबवा
कोकणवासीयांची मागणी; दरडी, भूस्खलनामुळे धोकादायक, ठोस उपाययोजनांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ : रत्नागिरी जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा ‘शॉर्टकट’ मार्ग म्हणून ओळखला जात असलेला अणुस्कूरा घाट मार्गामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पावसाळ्यात सातत्याने दरडी आणि माती कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. प्रवासाच्यादृष्टीने घाटमार्ग धोकादायक ठरत आहे. घाटरस्त्यामध्ये दरडीसह माती अन् दगड कोसळल्यानंतर बांधकाम विभागाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना तात्पुरत्या ठरतात. त्यामुळे धोकादायक दरडी, अरुंद अन् धोकादायक वळणे, संभाव्य भूस्खलन, संरक्षण कठड्यांची आवश्यकता आदींच्या अनुषंगाने सर्वेक्षण होऊन भविष्यामध्ये निर्धोक अणुस्कूरा घाटरस्ता तयार करण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार करून त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
सुमारे नऊ किमीचा असलेल्या तालुक्यातील अणुस्कूरा घाटमार्गाने कमी कालावधीमध्ये जा-ये करणे शक्य होत असल्याने अनेक वाहन चालकांकडून या मार्गाचा उपयोग केला जातो. नागमोड्या वळण्यांच्या या रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी उंच डोंगर, उभ्या रेषेतील दरडी, मोठमोठ्या दगडी ठिकठिकाणी कधीही खाली कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहेत. सातत्याने होणाऱ्या या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासह घाटरस्ता कायमस्वरूपी निर्धोक होण्यासाठी घाटरस्त्याचे परिपूर्ण आणि पूर्णपणे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.
----
घाटमार्गाची वैशिष्ट्ये
* लांबी : सुमारे ९ किमी
* रत्नागिरी-पश्चिम महाराष्ट्र ‘शॉर्टकट’ मार्ग
* पर्यटकांचे आकर्षण केंद्र
* पावसाळ्यात धबधबे व दाट धुके
---
वारंवार उद्भवणाऱ्या समस्या
* रस्ता तात्पुरता बंद पडणे
* वाहतूक विस्कळीत होणे
* पर्यटक व प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
* तात्पुरत्या दुरुस्तीवरच भर
---
चौकट ः
पिकनिक स्पॉट ठरतोय डेंजर झोन
नागमोड्या वळणाच्या अणुस्कूरा घाटमार्गातून प्रवास करताना दाट धुक्याने लपेटलेले आणि हिरवाईने नटलेले डोंगर, उंचावरून फेसाळत पाण्याचे कोसळणारे धबधबे अशा अलौकिक निसर्गसौंदर्याची अनुभूती घेण्याचा मोह प्रवाशांसह पर्यटकांना आवरता येत नाही. त्यासाठी घाटमार्गाच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ‘पिकनिक स्पॉट’ परिसरामध्ये प्रवासी, पर्यटक काहीकाळ थांबतात. मात्र, याच परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये भूस्खलन होऊन रस्ता बंद होतो. त्यामुळे बांधकाम विभागाचा पिकनिक स्पॉटवर स्पशेल वॉच राहणार आहे.
----
कोट ः
प्रवासाच्यादृष्टीने अणुस्कूरा घाट सुरक्षित राहावा यादृष्टीने बांधकाम विभागाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात घाटरस्त्यामध्ये आपत्ती ओढवल्यास आवश्यक ती यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे.
- स्वप्नील बावधनकर, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
---
कोट
शॉर्टकट मार्ग म्हणून अणुस्कूरा घाटमार्ग उपयुक्त असला तरी, पावसाळ्यात या मार्गावर होणारे भूस्खलन, दरड कोसळणे या प्रकारामुळे हा रस्ता धोकादायक ठरतो. घाटात अनेक ठिकाणी दरडी अन् मोठमोठे दगड रस्त्यावर येतात. त्यावर सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना होणे गरजेचे आहे. तसेच कायमस्वरूपी घाटमार्ग निर्धोक झाला पाहिजे.
- अमोल गुरव, वाहन चालक
---
मे अखेर काम पूर्ण होणे कठीण
अणुस्कूरा घाटमार्गावर ओणी ते पाचल दरम्याव ठिकठिकाणी मोठ्याप्रमाणात खड्डे आहेत. ते खड्डे चुकवित प्रवास करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. या मार्गच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यातून सुमारे १३ किलोमीटरचे डांबरीकरण आणि मजबूतीकरण ही कामे केली जाणार आहेत. परंतु सध्या पावसाचा अंदाज घेता ही कामे या महिन्यात होतीलच असे नाही. तसेच आंतरराष्ट्रीयस्तरावर असलेल्या युद्धजन्य स्थितीमुळे डांबर उपलब्ध होण्याची समस्या आहे. त्यामधून मार्ग काढून घाटमार्गाच्या मजबुतीकरण आणि डांबरीकरणाचे काम करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.