

पाचल येथे शेतकऱ्यांसाठी ‘बांबू डेपो’
वस्तू निर्मितीचे प्रशिक्षण ; जिल्हा बँक व उत्पादक कंपनीचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १४ ः बांबू शेतीला व्यावसायिक स्वरूप देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, समर्जुना शेतकरी उत्पादक कंपनी (पाचल) आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (शाखा पाचल) यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर-लांजा तालुक्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. बांबू लागवडीपासून वस्तू निर्मितीपर्यंतचे प्रशिक्षण, नर्सरी उभारणी आणि पाचल येथे ‘बांबू डेपो’ सुरू करण्याच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांसाठी नव्या संधीचे दालन खुले झाले आहे.
हा मेळावा पाचल ग्रामपंचायत सभागृहात झाला. जिल्हा बँकेच्या पाचल शाखेच्या वार्षिक पूजेनिमित्त या विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी समर्जुना शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्षा राजश्री विश्वासराव, उपाध्यक्षा धनश्री मोरे, स्नेहा सक्रे, सचिव सिद्धेश विश्वासराव, तुषार विश्वासराव, कार्याध्यक्ष मोहन नारकर, अनंत कोलते उपस्थित होते. तसेच जिल्हा बँकेच्या (रजिमस) संचालिका नेहा रवींद्र माने, संचालक मंदार सप्रे, शाखाप्रमुख पाटणकर यांच्यासह कंपनीचे संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी-कर्मचारी आणि परिसरातील सुमारे १०० बांबू उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षा राजश्री विश्वासराव यांनी शेतकऱ्यांना बांबू लागवड, तोडणी आणि बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जूनच्या पहिल्या आठवड्यात बांबूपासून वस्तू बनवू इच्छिणाऱ्या ३० शेतकऱ्यांसाठी नागपूर येथे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, त्याचा संपूर्ण खर्च कंपनी उचलणार आहे. बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय योजनेंतर्गत प्रति एकर ४०० बांबू रोपांची लागवड केली जाणार आहे. तसेच, काही शेतकऱ्यांची जमीन कराराने घेऊन कंपनीमार्फत बांबू लागवड केली जाणार असून त्यासाठी बांबू नर्सरीही उभारण्यात येणार आहे. मेळाव्याच्या ठिकाणी बांबूपासून तयार करण्यात आलेल्या विविध आकर्षक वस्तूंचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. या उपक्रमामुळे बांबू शेतीला मोठी चालना मिळून ग्रामीण भागातील रोजगार आणि उत्पन्न वाढीस हातभार लागेल, असा विश्वास आयोजकांनी यावेळी व्यक्त केला.
---
बांबूला मिळेल अधिक दर
सध्या पाचलमार्गे दरवर्षी सांगलीच्या दिशेने जाणारा अंदाजे तीन हजार ट्रक बांबू आता या डेपोमध्ये एकत्रित करून त्याची थेट विक्री करणे या डेपोमधून शक्य होणार आहे. यामुळे वाहतूक खर्चात मोठी बचत होऊन बांबूला अधिक दर मिळेल असे शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले.
---