

फोटो : kan141.jpg
43487
कणकवली : येथील सिंपन प्रतिष्ठानच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना माजी मंत्री भाई गिरकर
समाज उन्नतीसाठी एकजूट कायम ठेवा
भाई गिरकर : कणकवलीत सिंपन प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १५ : बौद्ध समाजाने तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्षमा, करुणा आणि शीलता या तत्वज्ञानाचा प्रसार समाजात करावा. उच्चवर्णीयांकडून समाजावर अन्याय झाल्याच्या जुन्या गोष्टींमध्ये अडकून न राहता समाज उन्नतीसाठी एकजूट ठेवा, असे आवाहन माजी समाजकल्याण मंत्री विजय उर्फ भाई गिरकर यांनी येथे केले.
सिंपन प्रतिष्ठानतर्फे मराठा मंडळ सभागृहात परिवर्तन दिन अभिवादन आणि सिंपन पुरस्कार प्रदान सोहळा झाला. यात श्री.गिरकर बोलत होते. यावेळी सिंपनचे अध्यक्ष अनिल तांबे, सरचिटणीस बाळकृष्ण जाधव, कार्याध्यक्ष डॉ. संदीप कदम, खजिनदार दत्ता पवार आदी उपस्थित होते.
भाई गिरकर म्हणाले, बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समाजाला दिशा देणारे आहे. बौद्ध समाजबांधवांनी हे विचार आत्मसात करून इतर समाजापर्यंत पोहोचवले पाहिजेत. दरम्यान जानवली येथे सिंपन प्रतिष्ठानच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व संशोधन केंद्र उभारण्याचे काम सुरू असून पुढील वर्षी भूमिपूजन व्हावे, असा संकल्प समाजबांधवांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
अनिल तांबे यांनी १४ मे १९३८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले होते. हा दिवस परिवर्तन दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
डॉ. संदीप कदम म्हणाले, डॉ. आंबेडकरांच्या आगमनामुळे बहुजन समाजाला नवी ऊर्जा मिळाली. त्यांच्या परिवर्तनवादी विचारांना उजाळा देण्यासाठी सिंपन प्रतिष्ठान विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. जानवली येथील स्मारक व संशोधन केंद्रासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. स्मृतीशेष प्रा. रमाकांत यादव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा सिंपन जीवन गौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते एस. एस. मुंबकर यांना जाहीर झाला होता. हा पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारला. सिंपन विजयी भव युवा पुरस्कार शिल्पकार रोहन पवार यांना प्रदान करण्यात आला. तसेच सिंपन अमृत पुरस्कार लक्ष्मण चौकेकर, विशेष सन्मान पुरस्कार अजित पवार, नामानंद मोडक, प्रथमेश पडवळ, वाय. डी. सावंत, अशोक कदम, संदीप कदम यांना देण्यात आले. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. प्रा. वर्षा कदम यांनी आभार मानले.
चौकट
संविधान बदलण्याची हिंमत कोणातही नाही : भाई गिरकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान अत्यंत मजबूत असून ते बदलण्याची धमक कोणत्याही राजकीय पक्षात नाही. सत्तेच्या जोरावर संविधान बदलण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, कारण मी एक पँथर आहे, असे ठाम विधान भाई गिरकर यांनी यावेळी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.