दाणोली वाचनालयातर्फे ३० पासून व्याख्याने

दाणोली वाचनालयातर्फे
३० पासून व्याख्याने
Published on

दाणोली वाचनालयातर्फे
३० पासून व्याख्याने
ओटवणे ः दाणोली येथील साटम महाराज वाचनालयाने सावंतवाडी संस्थानचे अधिपती बापूसाहेब महाराजांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ३० जून ते ४ जुलै कालावधीत ‘पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज समजून घेताना’ व्याख्यानमालेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांत आयोजन केले आहे. व्याख्यानमालेचे यंदा सातवे वर्ष असून नेमळे, माजगाव, मळगाव, मळेवाड, दाणोली या पाच गावांतील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये उपक्रम राबविण्यात येणार आहे. वाचनालयाचे अध्यक्ष भरत गावडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. व्याख्यान असलेल्या गावातील माजी सैनिकांना निमंत्रित करण्यात येणार आहे. पाचही शाळांना सेवाभावी आदर्श शिक्षक डॉ. चंद्रकांत सावंत यांच्यातर्फे बापूसाहेबांची प्रतिमा, त्यांच्या जीवनचरित्राचे भेट पुस्तक देण्यात येणार आहे. समारोप ४ जुलैला दाणोलीत होईल. लाभ घेण्याचे आवाहन वाचनालय अध्यक्ष भरत गावडे, सचिव डॉ. लवू सावंत यांनी केले.
....................
वेंगुर्ले-म्हापसा बस
सलग दोन दिवस बंद
वेंगुर्ले ः येथील आगारातून मार्गस्थ करण्यात येणारी वेंगुर्ले-म्हापसा एसटी फेरी सलग दोन दिवस बंद ठेवल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. एसटी फेरी मध्येच अचानक बंद ठेवत असल्याने संतप्त प्रवासी वेंगुर्ले आगारप्रमुखांना जाब विचारणार आहेत. हंगाम संपल्यानंतर वेंगुर्ले आगारातून बोरिवली, अक्कलकोट, रत्नागिरी याठिकाणी विशेष एसटी फेऱ्या सुरू आहेत. त्यामुळे सोमवार ते शनिवार प्रवाशांसाठी खास सुरू केलेली वेंगुर्ले- म्हापसा एसटी फेरी अचानक बंद ठेवत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांकडून प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. वेंगुर्ले आगारातून दुपारी साडेतीन वाजता म्हापसा येथे सोडण्यात येणाऱ्या एसटीला चांगले भारमान असते. म्हापसा-कदंबा स्थानकावरून सायंकाळी सव्वापाच वाजता एसटी मार्गस्थ केली जाते. म्हापसा येथून परतणारे कामगार, व्यावसायिकांना ही बस सोयीची आहे.
......................
‘महावितरणची मनमानी
खपवून घेणार नाही’
दोडामार्ग ः तालुक्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला वीज ग्राहक संघटनेने तीव्र विरोध दर्शविला. ‘ग्राहकांवर कोणत्याही प्रकारची दादागिरी अथवा जबरदस्ती केल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल,’ असा आक्रमक इशारा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष सुभाष दळवी यांनी पत्रकार परिषदेमार्फत दिला. ‘स्मार्ट मीटरबाबत वीज ग्राहक संघटना कोणत्याही परिस्थितीत दादागिरी सहन करणार नाही. ग्राहकांनीही आता एकजूट दाखवत आपल्या हक्कांसाठी पुढे यावे. कोणीही स्मार्ट मीटर बसविण्यासाठी आले, तर त्यांना विरोध करा आणि वीज ग्राहक संघटना दोडामार्गला संपर्क करा,’ असे आवाहन दळवी यांनी केले. मांगेली येथे शनिवारी (ता. २७) महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. यावेळी वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष सुभाष दळवी, सचिव भूषण सावंत, आशीर्वाद मणेरीकर उपस्थित होते.
.........................
‘उपनिबंधक’तर्फे
उद्या प्रशिक्षण
सावंतवाडी ः महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण बिगरशेती व पगारदार पतसंस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. बुधवारी (ता. २४) सकाळी १० ते ४ या वेळेत बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी, जिल्हा बँक शेजारी (प्रधान कार्यालय) येथे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. सर्व पतसंस्थांनी याबाबत नोंदणी केल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन, सावंतवाडी येथे कळवावी, असे आवाहन अध्यक्ष सुनील राऊळ यांनी केले.
---
न्हावेलीत शनिवारी
व्हॉलीबॉल स्पर्धा
सावंतवाडी ः श्री देव इस्वटी कला, क्रीडा मंडळ, न्हावेली नागझरवाडीतर्फे शनिवारी (ता. २७) न्हावेली व सोनुर्ली गावमर्यादित पावसाळी व्हॉलीबॉल नाईट लीग स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम ५००१, द्वितीय ३००१, तृतीय २००१ रुपये अशी पारितोषिके देण्यात येतील. खेळाडू व संघ मालकांनी आकाश मोहिते व मुन्ना नाईक यांच्याशी संपर्क साधून आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com