आर्थिक गुंतवणुकीचा निर्णय सतर्कतेने घ्या

आर्थिक गुंतवणुकीचा निर्णय सतर्कतेने घ्या
Published on

swt247.jpg
46340
सिंधुदुर्गनगरी : गौतमी महाजन यांचा सत्कार करताना डॉ. सई लळीत, सतीश लळीत.

आर्थिक गुंतवणुकीचा निर्णय सतर्कतेने घ्या
गौतमी महाजन ः ‘घुंगरकाठी’तर्फे सिंधुदुर्गनगरीत ‘अर्थसंवाद’
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २४ ः कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीचा निर्णय शांतपणे, घाई न करता, गुंतवणूक सल्लागाराला उलटसुलट प्रश्न विचारून, पूर्ण माहिती घेऊन, विचारांती करण्याची गोष्ट आहे. असे केले तर पश्चातापाची वेळ येत नाही, असा कानमंत्र स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सिंधुदुर्गनगरी शाखेच्या व्यवस्थापक गौतमी महाजन यांनी दिला.
‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ सेवाभावी संस्थेने ‘अर्थसंवाद’ सदराखाली आयोजित केलेल्या ‘सुरक्षित गुंतवणूक, आर्थिक साक्षरता आणि सायबर सुरक्षा’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. ओरोस येथील दत्तराज सोसायटीच्या सभागृहात दीड तासाहून अधिक काळ झालेल्या या संवादात श्रीमती महाजन यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांचे शंकानिरसन केले. ‘घुंगुरकाठी’च्या सचिव डॉ. सई लळीत यांनी ग्रंथभेट आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. अध्यक्ष सतीश लळीत यांनी श्रीमती महाजन यांचा परिचय करून देत व्याख्यानाच्या आयोजनाचे उद्दिष्ट सांगितले.
श्रीमती महाजन यांनी गुंतवणुकीचे विविध प्रकार आणि पर्याय, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, सुरक्षित गुंतवणुकीसाठी असलेल्या पीपीएफसारख्या अनेक सरकारी योजना, क्रेडिट कार्ड, विमासंलग्न योजना, जनरल बँकींग आणि ऑनलाईन व्यवहार करताना घ्यायची काळजी, सायबर गुन्हेगारी आणि फसवणुकीचे प्रकार याबाबतच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या. कष्टपूर्वक मिळविलेला पैसा गुंतवताना कोणकोणत्या काळजी घेणे आवश्यक आहे, याबद्दल त्यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले.
त्या म्हणाल्या, ‘‘पैसे गुंतवायचे म्हणजे सर्वसामान्य माणूस मुख्यत: आवर्ती ठेव (आरडी) किंवा मुदत ठेव (एफडी) या पारंपरिक गुंतवणुकीचा विचार करतो. या दोन्ही गुंतवणुका सुरक्षित असल्या तरी त्यांचा परतावा तुलनेत कमी आहे. त्याऐवजी शेअर, म्युच्युअल फंड, विमासंलग्न योजना या तुलनेत अधिक परतावा देतात. शेअर्सचा पर्याय हा पूर्णवेळ अभ्यासाचा, काहीसा किचकट पर्याय असल्याने त्याबाबत अपुऱ्या अभ्यासाने उत्साह दाखवणे जोखमीचे ठरू शकते.’’
आजकाल बँकांच्या ॲपद्वारे, नेटबँकिंगद्वारे किंवा क्युआर कोड स्कॅन करून युपीआयद्वारे आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. यासाठी होणाऱ्या मोबाईलच्या वापरातील संभाव्य धोके त्यांनी विशद केले. ऑनलाईन बँकिंग सुविधा असलेला मोबाईल हा तिजोरीप्रमाणे आहे. तिजोरीच्या चाव्या आपण जशा कुणाकडेच देत नाही, त्याप्रमाणे मोबाईल हँडसेट कोणाकडेही, अगदी मुलांकडेही सोपवणे किती धोकादायक आहे, हे त्यांनी सोदाहरण सांगितले.

चौकट
लिंकद्वारे येणारे ॲप ‘डिलिट’ करा
कोणतेही ॲप डाऊनलोड करताना प्लेस्टोअर किंवा ॲपस्टोअरवरूनच करावे. कोणत्याही लिंकद्वारे येणारे ॲप चुकूनही वापरू नये. अशा लिंक त्वरित डिलिट कराव्यात. आपल्या खात्यात काही घोटाळा झाल्याची शंका आल्यास काय काळजी घ्यावी, याबाबत त्यांनी अनेक सूचना केल्या. शेवटी डॉ. सई लळीत यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com