

इंधन नियमांमुळे शेतकऱ्यांची कोंडी
लांज्यातील शेतीची कामे खोळंबली; कृषियंत्रे थांबण्याची भीती
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २४ : शासनाने ११ जूनला जारी केलेल्या एका नवीन आदेशामुळे शेतकऱ्यांसमोर डिझेल आणि पेट्रोल उपलब्धतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या आदेशानुसार पेट्रोलपंपांवर बॅरल, कॅन किंवा बाटल्यांमध्ये पेट्रोल व डिझेल देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचा थेट फटका बळीराजाला बसत असल्याने ऐन खरिप हंगामाच्या तोंडावर लांजा तालुक्यातील शेतकरीवर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे.
सध्या पावसाळा सुरू झाल्याने शेतात नांगरणी, पेरणीपूर्व मशागत आणि कृषिकामांना वेग आला आहे. अशा परिस्थितीत ट्रॅक्टर, ग्रासकटर, फवारणी पंप, छोटी नांगरणी यंत्रे व रोटरसारखी आधुनिक यंत्रसामग्री थेट शेतातच कार्यरत असते. ही अवजड यंत्रे केवळ डिझेल-पेट्रोल भरण्यासाठी शेतातून थेट पेट्रोलपंपावर नेणे शेतकऱ्यांना अजिबात शक्य होत नाही. त्यामुळे शेतकरी पूर्वीप्रमाणेच बॅरल किंवा कॅनमधून इंधन आणून शेतातच यंत्रांमध्ये भरत असत; मात्र, नव्या निर्बंधांमुळे पेट्रोलपंपांनी अशा प्रकारे इंधन देणे बंद केले आहे.
कृषियंत्रे इंधन भरण्यासाठी पंपावर न्यायची झाल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त वेळ, श्रम आणि इंधनखर्च करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरिप हंगामात मशागतीचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. इंधनाअभावी मशागतीची कामे वेळेत पूर्ण न झाल्यास पेरणी उशिरा होईल आणि पर्यायाने त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
----
शेतकरी दुहेरी संकटात
आधीच शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नाही, उत्पादन खर्च सातत्याने वाढत आहे आणि निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामांवर गदा आणणाऱ्या या कठोर निर्णयाचा शासनाने तातडीने पुनर्विचार करावा आणि शेतकऱ्यांसाठी या नियमात आवश्यक ती सवलत द्यावी, अशी मागणी आता लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.