

फळबाग लागवडीतून घडेल ‘कॅलिफोर्निया’
डॉ. बाळासाहेब यादव ः ‘मार्गताम्हाणे’मध्ये काजू लागवड उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ : ‘फळबाग लागवड ही कोकणातील शेतीला नवी दिशा देणारी आहे. काजू, आंबा, नारळ, सुपारी यांसारख्या फळपिकांच्या नियोजनबद्ध लागवडीतून कोकणचा ‘कॅलिफोर्निया’ साकारू शकतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीद्वारे आपली आर्थिक उन्नती साधावी,’ असे प्रतिपादन मार्गताम्हाणे येथील डॉ. तात्यासाहेब नातू वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव यांनी केले.
मार्गताम्हाणे उगवतवाडी येथील प्रगतिशील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या शेतजमिनीमध्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने काल (ता. १४) काजू लागवड उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे ४० स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्साहाने सहभागी झाले होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. यादव बोलत होते. ते म्हणाले, ‘पर्यावरण संवर्धन, मृदा व जलसंधारण तसेच शाश्वत शेतीसाठी फळबाग लागवड अत्यंत आवश्यक आहे. काजूसारख्या नगदी पिकांमुळे शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळू शकते. युवकांनी शेतीकडे आधुनिक दृष्टिकोनातून पाहून उत्पादनवाढीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा.’
या सर्व बाबींविषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून सविस्तर माहिती घेतली. ग्रामीण भागात वृक्ष संवर्धनासोबतच शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबवलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक ठरला. प्रगतिशील शेतकरी प्रशांत चव्हाण यांनी महाविद्यालयाच्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या श्रमदानामुळे फळबाग लागवडीच्या कामाला मोठी मदत झाल्याचे सांगत त्यांनी भविष्यातही अशा सामाजिक व कृषीविषयक उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
--
विद्यार्थ्यांनी केली प्रात्यक्षिकं
मार्गताम्हाणेतील या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी काजूच्या रोपांच्या नियोजनबद्ध लागवडीचे प्रात्यक्षिक केले. त्यात योग्य आकाराचे खड्डे तयार करणे, सेंद्रिय खतांचा संतुलित वापर, रोपांची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड, लागवडीनंतरची निगा व संगोपन यांची सविस्तर माहिती घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.