राजापूर : नोकरी सोडून शेतीत केले वैविध्यपूर्ण प्रयोग

राजापूर : नोकरी सोडून शेतीत केले वैविध्यपूर्ण प्रयोग
Published on

rat15p7.jpg-
51032
राजापूर ः प्रगतशील शेतकरी अन् कृषी अभ्यासक डॉ. शैलेश शिंदेदेसाई यांना ‘वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार देऊन गौरवताना राज्यपाल जिष्णू देव वर्मा, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि मान्यवर.
--------------
नोकरी सोडून शेतीत केले वैविध्यपूर्ण प्रयोग
डॉ. शैलेश शिंदे देसाई यांचे यश; शेतीमित्र पुरस्काराने सन्मान
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ : हवामानातील प्रतिकूल बदल आणि शेतीतील वाढता खर्च यामुळे आजचा तरुण शेतीपासून दूर जात असताना, शेतीला व्यावसायिक रूप देण्याचा ध्यास घेत राजापूरच्या एका सुपुत्राने आदर्श निर्माण केला आहे. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून गेल्या दीड-दोन दशकांपासून आधुनिक शेती, अध्यापन, संशोधन आणि कृषी विस्तारात बहुमूल्य योगदान देणारे डॉ. शैलेश शिंदेदेसाई यांना ‘वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठातून कृषी पदवी आणि पीएचडी पूर्ण केल्यानंतर डॉ. शिंदेदेसाई यांनी काही काळ नोकरी केली; मात्र, शेतीला पारंपरिकतेकडून व्यावसायिकतेकडे नेण्याच्या इच्छेपोटी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. राजापूर तालुक्यातील ओणी येथे त्यांनी प्रत्यक्ष शेतीला सुरवात केली. तिथे नवनवीन प्रयोग करत त्यांनी आंबा-काजू आणि बांबू लागवडीसोबतच ठिबक सिंचन, जैविक कीड व्यवस्थापन, शेततळे, रोपवाटिका, मत्स्यपालन, ग्रामीण पर्यटन, काजू प्रक्रिया उद्योग आणि गोपालन असे एकात्मिक कृषी व्यवसाय यशस्वीपणे उभे केले. विशेषतः काजू प्रक्रिया उद्योगातून मूल्यवर्धित उत्पादने तयार करून त्यांनी स्वतःला एक यशस्वी कृषी उद्योजक म्हणून सिद्ध केले.
संशोधन आणि अध्यापनाचा प्रत्यक्ष शेतीशी सुरेख संगम घालत डॉ. शिंदेदेसाई यांनी आपले ज्ञान कोकणासह राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले.
गेल्या २० वर्षांत त्यांनी ३५०हून अधिक शेतकरी मेळावे, चर्चासत्रे, कृषी विभाग, नाबार्ड, जिल्हा बँका आणि विविध विकास सोसायट्यांच्या कार्यशाळांमध्ये तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले आहे. आधुनिक शेती, पीक व्यवस्थापन, फलोत्पादन आणि बाजारपेठ नियोजनाचे त्यांनी दिलेले प्रशिक्षण हजारो शेतकऱ्यांसाठी उत्पादन व उत्पन्न वाढवणारे ठरले आहे.

चौकट
ते देतात आधुनिक शेतीचे धडे
डॉ. शैलेश शिंदेदेसाई यांनी कृषीक्षेत्रात भरीव संशोधन केले आहे. त्यांनी लिहिलेले ‘कोकण विभागातील काजूप्रक्रिया व्यावसायिकांची उद्योजकीय क्षमता’ हे पुस्तक जर्मनीतील एका जगप्रसिद्ध प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे. याशिवाय, त्यांचे चार शास्त्रीय संशोधन लेख आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते दररोज शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे देत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com