झाडामागे 50 रुपये भरण्याचा आदेश रद्द करा

झाडामागे 50 रुपये भरण्याचा आदेश रद्द करा
Published on

swt१५३९.jpg
51216
कोल्हापूर : मुख्य वनसंरक्षक श्री लक्ष्मी यांना निवेदन देताना बाळ भिसे, लक्ष्मण गावडे, शिवाजी गवस, संदीप सुकी, प्रमोद सावंत, दीपक इस्वलकर, पिंटू राणे आदी.

झाडामागे ५० रुपये भरण्याचा आदेश रद्द करा
सिंधुदुर्ग शेतकरी-व्यापारी संघ : कोल्हापूर वन विभागाच्या मुख्य वनसंरक्षकांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. १६ : एक झाड तोडण्याच्या बदल्यात दोन झाडे लावण्याचे हमीपत्र शेतकरी देत असताना आता झाड लागवडीसह प्रत्येक झाडाचे ५० पन्नास रुपये वन खात्याच्या नावे बँकेत जमा करण्याचा वन खात्याचा फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता बजावलेला आदेश अन्यायकारक असून हा आदेश तात्काळ रद्द करावा. याबाबत येथे आठ दिवसात कार्यवाही न केल्यास वनमंत्री गणेश नाईक यांचे लक्ष वेधणार असल्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी व्यापारी संघाने एका निवेदनाद्वारे कोल्हापूर वन विभागाच्या मुख्य वनसंरक्षक श्री लक्ष्मी यांना दिला आहे.
महाराष्ट्र झाडतोड (विनियमन) अधिनियम १९६४ अन्वये वृक्षअधिकारी हे खाजगी मालकी क्षेत्रातील निर्बंधीत जातीच्या झाडांना वृक्षतोडीस परवानगी देतात. मात्र कोल्हापूरचे तत्कालीन मुख्यवनसंरक्षक यांनी फेब्रुवारीत महाराष्ट्र झाडतोड (विनियमन) अधिनियम १९६४ व महाराष्ट्र जमीन महसूल संहीता १९६६ अंतर्गत झाडतोडीसाठी परवानगी देतांना हमीपत्रामध्ये एक झाड तोडणेच्या बदल्यात दोन झाडे लावण्याच्या अटीनुसार सदर झाडांचे ५० रुपये प्रति झाड याप्रमाणे वनक्षेत्रपाल कार्यालयाच्या खात्यावर भरणा करावेत असे आदेश काढले. मात्र असे आदेश महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्याला लागू नाही आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर हा एक प्रकारचा अन्यायच आहे. त्यामुळे या आदेशाबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
मुळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी हे झाडतोडी साठी वनविभागाची परवानगी घेवून त्या बदल्यात दुप्पट झाडांची लागवड करीन असे वन अधिकारी यांच्या समोर १०० रुपये स्टॅम्प पेपरवर लिहून देवून झाडांची लागवड करतात. त्यासाठी शेतकरी वन खात्याच्या नर्सरी मधून झाडे विकत घेऊन लागवड करतात. त्यानंतर वनखात्याचे अधिकारी या लागवडीची पाहणी करून तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवितात. असे असताना प्रत्येक झाड तोडी मागे ५० पन्नास रुपये वन खात्याला का द्यावे? असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. तसेच परवानगीने झाडे तोडल्यानंतर त्या क्षेत्रात बुध्यांपासून सहा महिन्यात फुटवे तयार होतात. तसेच शेतकरी खासगी जमिनीवर १०० टक्के काजूची लागवडही करतात. त्यामुळे झाड तोडीसाठी शेतकऱ्यांकडून प्रति झाड ५० रुपये वसूल करणे अन्यायकारक आहे. याबाबत तात्काळ कार्यवाही करून हा आदेश रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी शेतकरी व्यापारी संघाचे अध्यक्ष बाळ भिसे, लक्ष्मण गावडे, शिवाजी गवस, संदीप सुकी, प्रमोद सावंत, दीपक इस्वलकर, पिंटू राणे, मानू शेळके, पंकज साटम, तात्या पाटील, सूर्यकांत मिराशी, अजित थोरबोले, आपा इंदप, मधु बावकर, प्रतीक इस्वलकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com