परिवर्तन

परिवर्तन
Published on

परिवर्तन---------लोगो
(३० जुलै टुडे ३)

ईश्‍वराचे चराचरात असणे,
ईश्‍वर म्हणजे वेगळे काही नाही

म्हणौनि सानेंथोर न म्हणावें। उंचनीच भाव सांडावे।
एक मीचि ऐसें मानावें। वस्तुजातातें॥ अध्याय १० ओवी ३०५
अर्थ-लहान मोठा हा भेद टाकून सर्व वस्तूत एका भगवंतालाच स्मरावे.
या ओवीचा मतितार्थ असा की, या विश्‍वात लहान-मोठा असा भेद नसतो. उच्च-नीचही कोणी नसतो. सर्वजण परमेश्‍वराचेच अंश आहेत असे समजून आपली वर्तणूक असावी. माझा धर्म महान, माझा ईश्‍वर मोठा किंवा माझा गुरू महान, असे वाद घालणे आणि त्यावरून हाणामाऱ्या करत राहणे, ही परमेश्‍वराची एकप्रकारे प्रतारणाच आहे........!
- rat५p८.jpg-
26O55383
- डॉ. शरद प्रभूदेसाई, रत्नागिरी
----
परि या तुझिया रूपाआंतु। जी उणीव एक असें देखतु।
जे आदि मध्य अंतु। तिन्हीं नाहीं॥ अध्याय ११ ओवी २८०
अर्थ-या भगवंताच्या रूपात एक उणीव जाणवते. त्याला आदि, मध्य आणि अंत नाही. ही अकराव्या अध्ययातील एक ओवी अस सांगते की, परमेश्‍वराला आदी, मध्य किंवा अंत नाही. मग त्याला विविध रूपे का द्यायची?
अकराव्या अध्यायात ईश्‍वराचे विश्वरूप दर्शन दाखवले आहे. परत एकदा ईश्‍वराचे चराचरात असणे, हेच वर्णिले आहे. ईश्‍वर ईश्‍वर म्हणजे वेगळे काही नाही.
जे मन बुद्धि इहीं। घर केलें माझां ठायीं।
तरि सांगें मग काई। मी तूं ऐसें उरे॥ अध्याय १२ ओवी ९९
अर्थ-मन आणि बुद्धी या दोघांचे घर जर माझ्याच ठिकाणी असेल तर मी-तूपण उरणारच नाही.
मनाने आणि बुद्धीने देवत्व सर्व ठिकाणी मानले की, देव आपल्याहून वेगळा उरतच नाही. आपण करत असलेले कर्म हे विश्‍वातील चराचराशी
निगडित असते. ही देवभक्तीच होय. मग वेगळी ईश्‍वरोपासना करण्याचे प्रयोजनच उरत नाही.
याच संदर्भात ‘श्री’ला एक संस्कृत श्‍लोक म्हणा किंवा सुभाषित म्हणा आठवले. माणूस करत असलेले किंवा मानत असलेल्या सर्व गोष्टी ईश्‍वराचीच प्रेरणा आहे. माणसाकडून होणारी यच्चयावत् कर्मे त्याचीच आराधना आहे. तो श्‍लोक खालीलप्रमाणे
आत्मा त्वं, गिरिजा मति:, सहचर: प्राण:, शरीरं गृहम्।
पूजा ते विषयोपभोगरचना, निद्रा समाधी स्थिति:।
संचार: पदयो प्रदक्षणविधी:, स्तोत्राणि सवौ गिरौ।
यद् यद् कर्म करोमि तद् तदाखिलं शंभो तवाराधनम्।
अर्थ-हे शंकरा! माझ्या ठिकाणचा आत्मा तूच. माझी बुद्धी हीच तुझी गिरिजा, माझे पंचप्राण हेच तुझे सहचर. माझ्या विषयोपभोगांची व्यवस्था हीच तुझी षोड्शोपचार पूजा, माझे चालणे हीच मजकडून घडणारी तुझी प्रदक्षिणा, माझे बोलणे हेच तुझे स्तोत्रपठण आणि मजकडून घडणारे यच्चयावत् कर्म हीच तुझी आराधना!
थोडक्यात काय, तर वेगळी ईश्‍वराधना करण्याची गरज नाही आणि अशी मनाची आणि बुद्धीची धारणा झाल्यावर प्रपंचातील कर्तव्ये ईश्‍वराहून वेगळी उरतच नाहीत.
उणयापुरयाचें कांहीं। उरों नेदीं आपुलां ठायीं।
स्वजातीचि करूनि घेईं। जीवित हें॥ अध्याय१२ओवी११९
अर्थ- हाती घेतलेले काम अर्धे राहिले किवा पूर्ण झाले तरी खंत न बाळगता आपले जीवन ‘स्व’शी प्रामाणिक असावे.
आणि जें जें कर्म निपजे। तें थोडेंबहु न म्हणिजे।
निवांतचि अर्पिजे। माझां ठायीं॥ अध्याय१२ओवी१२३
अर्थ-घेतलेले काम अधिक उणे झाले तरी ते माझ्या ठायी अर्पण करावे.
दोन्ही ओव्यात काम कमी-जास्त, माझे परक्याचे असा विचार न करता करत राहावे. हे सर्व ईश्‍वराचेच आहे. समर्पित भावनेने केलेले काम हीच देवपूजा होय. थोडक्यात, उत्तम आचरण हे जीवनाचे सार्थक मानावे. त्याचबरोबर आपण केलेल्या कामाचा अभिमान ही नसावा.
जो सर्व भूतांचां ठायीं। द्वेषातें नेणेचि कही।
आपपरु नाहीं। चैतन्या जैसा॥ अध्याय१२ओची१४४
अर्थ-चैतन्य जसे सर्व प्राण्याच्या ठायी सारखेच असते. आपपर भाव ठेवत नाही किवा कुणाचाही द्वेष करत नाही तसे आपणही आपपर हा भेद मानू नये.

(लेखक बालरोगतज्ज्ञ आणि चिंतनशील अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com