

पैसा बोलतो, आपण ऐकतो?.................लोगो
(३१ जुलै टुडे २)
विमा घेताना कोणती काळजी घ्यायची?
विमा घेताना अनेकदा आपलं लक्ष प्रीमियम, कव्हरची रक्कम आणि किती परत मिळणार? या प्रश्नांवर जाते; पण विम्याचा खरा उपयोग कधी तपासला जातो? क्लेमच्यावेळी. पॉलिसी घेताना सगळं सोपं वाटतं; पण रुग्णालयात भरती झाल्यावर, अपघातानंतर किंवा एखाद्या अनिश्चित घटनेनंतर क्लेम करताना जर कंपनीने अटी दाखवल्या, कागदपत्रं मागितली किंवा क्लेम नाकारला तर लोकांचं म्हणणं असतं. ‘प्रीमियम भरूनही काही उपयोग झाला नाही,’ हा अनुभव टाळायचा असेल तर विमा घेतानाच काही गोष्टी स्पष्ट समजून घेणं आवश्यक आहे.
- rat६p१.jpg-
26O55592
- वैभव देवधर, सीए, रत्नागिरी
--
सर्वात पहिली काळजी म्हणजे माहिती लपवू नये. आरोग्यविमा किंवा जीवनविमा घेताना आधीचे आजार, औषधोपचार, शस्त्रक्रिया, धूम्रपान, मद्यपान, व्यावसायिक जोखीम, उत्पन्न याबद्दल चुकीची किंवा अपुरी माहिती दिली तर पुढे क्लेमच्यावेळी अडचण निर्माण होऊ शकते. अनेकांना वाटतं, ‘आता सांगितलं तर प्रीमियम वाढेल’ किंवा ‘पॉलिसी मिळणार नाही;’ पण कमी प्रीमियमसाठी चुकीची माहिती देणं म्हणजे स्वतःच्या संरक्षणातच छिद्र ठेवणं. विमा हा विश्वासावर चालणारा करार आहे त्यामुळे डिस्क्लोजर ही केवळ औपचारिकता नाही तर पॉलिसीच्या वैधतेचा पाया आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉलिसीमधील अटीशर्ती वाचणं. बहुतेक लोक ब्रोशर, एजंटचं बोलणं किंवा जाहिरात यावर निर्णय घेतात; पण अंतिम अधिकार पॉलिसीमधील शब्दांना असतो. त्यात वेटिंग पिरियड, एक्सक्लुझन, रूम रेन्ट लिमिट, को-पेमेंट, सबलिमिट, प्री-एक्जिस्टिंग डिसिजची अट, क्लेम प्रोसिजर, ग्रेस पिरियड अशा अनेक गोष्टी असतात. उदाहरणार्थ, आरोग्यविम्यात काही आजारांवर सुरुवातीची दोन-तीन वर्षे वेटिंग पिरियड असू शकतो. काही पॉलिसींमध्ये रूम रेंटची मर्यादा असते. रुग्णालयाचा खर्च मोठा झाला तरी त्या मर्यादेमुळे क्लेम प्रपोशनल कमी होऊ शकतो. मग ग्राहकाला वाटतं की, कंपनीने पैसे कापले; पण ती अट पॉलिसीत आधीपासून असते.
तिसरी काळजी म्हणजे विमा रक्कम आणि पॉलिसीचा प्रकार योग्य निवडणं. आरोग्यविमा घेताना फक्त स्वस्त प्रीमियम पाहून कमी कव्हर घेणं धोकादायक ठरू शकतं. आज मोठ्या शहरातील वैद्यकीय खर्च पाहता रु. ५-१०लाखांचं कव्हरदेखील अनेकवेळा अपुरं पडतं. जीवनविम्यातही एन्डोमेंट किंवा मनी- बॅक पॉलिसी घेतल्याचं समाधान असतं; पण प्रत्यक्ष संरक्षण रक्कम कुटुंबाच्या गरजांच्या तुलनेत कमी असते म्हणजे पॉलिसी असते; पण संरक्षण अपुरं असतं.
चौथी गोष्ट म्हणजे नॉमिनी आणि कागदपत्रं व्यवस्थित ठेवणं. अनेक कुटुंबांत पॉलिसी घेतली जाते; पण घरच्यांना तिची माहितीच नसते. पॉलिसी नंबर, इन्शुरन्सचे तपशील, प्रीमियम ड्यू डेट, नॉमिनी, मेडिकल रेकॉर्डस्, हॉस्पिटल बिल्स, डिस्चार्ज समरी, एफआयआर किंवा अपघाताची कागदपत्रं व्यवस्थित नसतील तर क्लेम प्रोसेस अडकू शकतो. विमा घेतला म्हणजे काम संपत नाही; तो वापरता येईल अशी व्यवस्था ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
पाचवा मुद्दा म्हणजे प्रीमियम वेळेवर भरणं. काही लोक पॉलिसी घेतात, दोन-तीन वर्षे प्रीमियम भरतात आणि नंतर दुर्लक्ष होतं. पॉलिसी लॅप्स झाली, ग्रेस पीरियड संपला किंवा रिन्युअलमध्ये खंड पडला तर क्लेमच्यावेळी गंभीर अडचण येऊ शकते. आरोग्यविम्यात कन्टिन्युटी खूप महत्त्वाची असते, कारण वेटिंग पीरियड आणि प्री-एक्झिस्टिंग डिसिज कवरेज यावर तिचा परिणाम होतो.
म्हणून ‘प्रीमियम भरला म्हणजे संरक्षण मिळालं’ असा सरळ निष्कर्ष काढू नये. योग्य माहिती दिली का, पॉलिसीच्या अटी समजल्या का, कव्हर पुरेसं आहे का, एक्सक्लुजन माहित आहेत का, नॉमिनी आणि डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत का, प्रीमियम कन्टिन्युटी आहे का या सगळ्या गोष्टी मिळून विमा प्रत्यक्ष उपयोगी ठरतो. विमा हा फक्त खरेदी करण्याचा विषय नाही; तो नीट समजून, योग्य प्रकारे टिकवून ठेवण्याचा विषय आहे.
विम्याचा क्लेम नाकारला गेला तर प्रत्येक वेळी कंपनी चुकीचीच असते असं नाही आणि ग्राहक चुकलाच असतो असंही नाही; पण अनेक अडचणी विमा घेतानाच काळजी घेतली तर टाळता येतात म्हणून विमा घेताना प्रश्न फक्त ‘प्रीमियम किती?’ हा नसावा; प्रश्न असा असावा ‘संकटाच्या वेळी ही पॉलिसी खरंच उपयोगी पडेल का ?’
(लेखक सीए असून, रत्नागिरीत प्रॅक्टिस करत आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.