हनुमंतगडावर पोलिस तैनात

हनुमंतगडावर पोलिस तैनात
Published on

हनुमंत गडावर
पोलिस तैनात
ओटवणेः फुकेरी येथील हनुमंत गडावर शनिवारी, रविवारी पर्यटनासाठी जाणार्‍या काही पर्यटकांकडून हुल्लडबाजी, अस्वच्छता तसेच मद्यपान करणे, गांजा-सिगारेट ओढणे यांसारखे प्रकार निदर्शनास आले आहेत. फुकेरी ग्रामपंचायत आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानने दोडामार्ग पोलिस आणि तहसीलदार यांचे लक्ष वेधताच या ठिकाणी पोलिस पथक तैनात करण्यात आले आहे. हनुमंत गडावर जाणाऱ्या पर्यटकांची कसून तपासणी करण्यात येत असून पर्यटकांच्या गाड्यांची पार्किंग व्यवस्था मंदिराच्या परिसरातच करण्यात आली आहे. पर्यायाने गडाच्या पायथ्याशी गाडी घेऊन जाणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांना चपराक बसणार आहे. अस्वच्छता, वादविवाद आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने घेतलेला दोडामार्ग निर्णय स्वागतार्ह असल्याचे फुकेरी ग्रामपंचायत आणि सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदुस्थानने म्हटले आहे. कुटुंबासह करणाऱ्या पर्यटकांनी दुर्गभ्रमंती समाधान व्यक्त केले आहे. यापुढे अयोग्य प्रकार निदर्शनास आल्यास सह्याद्री प्रतिष्ठान अध्यक्ष सुनील राऊळ, सरपंच नीलेश आईर यांच्याशी संपर्क साधावा.
.......................
ॲथलेटिक्स स्पर्धेत
पुष्कर राणेचे यश
मालवणः तालुक्यातील वायंगवडे येथील पुष्कर राणे याने सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. पुष्करची आई वायंगवडे ग्रामपंचायत सदस्य आहे. माजी पोलिस अधिकारी राजेंद्र राणे यांनी पुष्करचे अभिनंदन केले. धावण्याच्या स्पर्धांमध्ये सातत्य राखत मॅरेथॉन स्पर्धांमध्येही सहभागी होण्याचा सल्ला त्यांनी दिला. सातत्यपूर्ण सराव, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर भविष्यात आणखी मोठे यश मिळवशील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
........................
खोटलेत उद्या
पादुका दर्शन
मसुरेः स्वामी समर्थ महाराजांचे मानसपुत्र स्वामीसुत महाराजांच्या पादुकांचे आगमन व दर्शन शनिवारी (ता. ८) सायंकाळी स्वामी समर्थ श्रद्धास्थान, क्षेत्र खोटले येथे आयोजित केला आहे. १६० वर्षांत प्रथमच हा सोहळा होत असल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे. सोहळ्याची सुरुवात सायंकाळी ६ वाजता पाद्यपूजनाने होईल. नंतर ६.३० वाजता पादुकांचे दर्शन, ७ वाजता भारतीय साधुसंत आखाडा अध्यक्ष महंत मोनी बाबा (नागपूर) यांच्या हस्ते महाप्रसाद मंडप समर्पण होणार आहे. श्री स्वामी समर्थ आत्मलिंग पादुका मठ, मुंबईपुरीचे मठाधीश विजय नलावडे (स्वामीसुत महाराज यांचे वंशज), स्वामीभक्त प्रल्हाद परब यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता संगीत विशारद बुवा सुंदर मेस्त्री यांच्या भजनसेवेचा कार्यक्रम, रात्री ८.३० ते ९.३० पर्यंत महाप्रसाद, ९.३० वाजता पादुकांचे प्रस्थान होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन गणेश घाडीगावकर यांनी केले आहे.
......................
सिंधुदुर्गनगरीत १० ला
फळपीक विमा बैठक
कणकवलीः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना २०२५-२६ मधील जिल्ह्यातील काही शेतकरी तांत्रिक त्रुटीमुळे भरपाईपासून वंचित आहेत. या शेतकर्‍यांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री नीतेश राणे यांनी सोमवारी (ता. १०) सकाळी ११.३० वाजता त्यांच्या मंत्रालयातील दालनात महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. तांत्रिक त्रुटीमुळे जिल्ह्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याबाबत सावंत यांनी पालकमंत्री राणे यांचे लक्ष वेधले होते. तसेच या अनुषंगाने उच्चस्तरीय अधिकार्‍यांची बैठक आयोजित करून हा विषय मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने पालकमंत्री राणे यांच्या दालनात ही बैठक होणार आहे.
...........................
एम-सॅंड, स्टोन क्रशर
प्रकल्प रद्दची मागणी
दोडामार्ग ः तालुक्यातील पिकुळे, उसप, बोडदे, केर या गावांच्या हद्दीत प्रस्तावित क्वारी, एम-सँड व स्टोन क्रशर प्रकल्प तत्काळ रद्द करावा, अशी मागणी अ‍ॅड. अनिल दळवी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, प्रकल्पामुळे पर्यावरण, शेती, पाणी, जैवविविधता, नागरिकांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार आहे. फळबागांचे नुकसान होऊन ग्रामस्थांच्या उत्पन्नावर विपरित परिणाम होईल. त्यामुळे लोकभावनेचा आदर करून प्रकल्पासंदर्भातील प्रक्रिया तत्काळ स्थगित करून तहसीलदारांकडून अहवाल मागवून निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. तालुक्यातील ५६ गावांचे प्रतिनिधी, दोडामार्ग तालुका विकास मंडळ (मुंबई), सामाजिक संस्था, सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची मंत्रालयात १५ दिवसांत उच्चस्तरीय बैठक आयोजित करून लोकहिताचा निर्णय घ्यावा, अशी विनंतीही केली आहे. अ‍ॅड. दळवी यांनी हेच निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सादर केले आहे.
...........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com