जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करा

जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करा
Published on

जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करा
डॉ. सई धुरी : जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जिल्ह्यात जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ६ : बाळाच्या जन्मानंतरचा पहिला तास आणि त्यानंतरचे पहिले सहा महिने त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करावे आणि पहिले सहा महिने बाळाला केवळ आईचे दूध द्यावे, असा आरोग्य विभागाचा संदेश आहे. सहा महिन्यांनंतर पूरक आहारासोबत दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ स्तनपान सुरू ठेवावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच आरोग्य व आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.
यावर्षीच्या जागतिक स्तनपान सप्ताहाची संकल्पना ‘शाश्वत जीवनाच्या सुरुवातीसाठी स्तनपान : जे प्रभावी आहे ते अधिक बळकट करा’ अशी आहे. या अनुषंगाने स्तनपानाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत. गर्भवती व स्तनदा मातांना योग्य स्तनपान तंत्र, काढलेले आईचे दूध सुरक्षितरीत्या वापरण्याबाबत तसेच स्तनपान करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी समुपदेशन केले जात आहे.
गर्भवती माता, स्तनदा माता व त्यांच्या कुटुंबीयांना जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे. पहिले सहा महिने बाळाला केवळ आईचे दूध द्यावे. या काळात पाणी, मध, गुटी, बाहेरचे दूध अथवा अन्य कोणताही आहार देऊ नये, असा संदेशही देण्यात येत आहे.
स्तनपानामुळे बालकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कुपोषणाचा धोका कमी होण्यासोबतच संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते आणि बाळाच्या सर्वांगीण वाढीस चालना मिळते. आईच्या आरोग्यासाठीही स्तनपान लाभदायक असून प्रसूतीनंतरच्या आरोग्य सुधारण्यास मदत होते. आईचे पहिले पिवळसर दूध अर्थात कोलोस्ट्रम हे नवजात बालकासाठी नैसर्गिक संरक्षण असून, त्याला बाळाचे ‘पहिले लसीकरण’ मानले जाते.

चौकट
आशा स्वयंसेविकांकडून गृहभेटीतून समुपदेशन
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या एमएए (मदर्स ॲबसोल्यूट अफेक्शन) कार्यक्रमाद्वारे मातांना स्तनपानाचे महत्त्व पटवून देणे, योग्य स्तनपान तंत्राचे प्रात्यक्षिक, स्तनपानातील अडचणींचे निराकरण तसेच कुटुंबीयांचे प्रबोधन यावर विशेष भर दिला जात आहे. याशिवाय गृहआधारित नवजात बालक आरोग्य सेवा (एचबीएनसी) आणि गृहआधारित लहान बालक आरोग्य सेवा (एचबीवायसी) कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी नियमित गृहभेटी देऊन मातांना समुपदेशन करीत आहेत. शिशू दूध पर्याय (आयएमएस) अधिनियमानुसार बाहेरील दुधाचा अनावश्यक प्रचार व वापर टाळण्याबाबत जनजागृती करण्यात येत असून, नवजात बालकांसाठी आईचे दूध हेच सर्वोत्तम पोषण असल्याचा संदेश दिला जात आहे.

कोट
स्तनपान सप्ताहादरम्यान समुपदेशन, आरोग्य शिक्षण, जनजागृती रॅली, पोस्टर प्रदर्शन, शपथविधी तसेच विविध माहितीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या जनजागृती अभियानात सहभागी होऊन स्तनपानाबाबतचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचवावा.
- डॉ. सई धुरी, जिल्हा आरोग्य अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com