रानभाजी पाककृतीतून खाद्यसंस्कृतीचे जतन

रानभाजी पाककृतीतून खाद्यसंस्कृतीचे जतन
Published on

swt62.jpg
55618
वडाचापाट ः हायस्कूलमध्ये आयोजित पाककला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रानभाजी पाककृतीतून खाद्यसंस्कृतीचे जतन
वडाचापाट हायस्कूलचा उपक्रम ः स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ६ : आरोग्य-जागरूकता आणि पारंपरिक आहाराचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलात आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी पाककला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पावसाळ्यात सहज उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचे पौष्टिक गुणधर्म आणि तंदुरुस्तीविषयीची जनजागृती वाढविण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत शाळेतील एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून रानभाज्यांवर आधारित आकर्षक व चवदार पाककृती सादर केल्या. यामध्ये प्रामुख्याने लाजरीच्या पानांचे कटलेट, उंबराच्या फळांची भाजी, आघाड्याच्या पानांची भाजी, टाकळाची वडी, टाकळ्याची भजी व कटलेट, शेवग्याच्या पानांचे पराठे व भजी, अळूवडी आणि अळूच्या गाठी, फोडीशीची भजी, घोटीच्या वेलीची भाजी, कुर्डूवडी, दुदुर्ल्याची भाजी व पेवगा पराठा यांसारख्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचा समावेश होता.
यात अनुक्रमे सिद्धी पालव (लाजरीच्या पानांचे कटलेट), चैताली पाताडे (उंबराच्या फळांची भाजी), तृतीय (संयुक्त) हितेश वायंगणकर (आघाड्याच्या पानांची भाजी), नेहा पालव (शेवग्याच्या पानांचे पराठे), उत्तेजनार्थ कनिका पाटकर (टाकळाचे कटलेट), वैदेही हडकर (शेवग्याच्या पानांची भजी), अदिती कदम (अळूवडी) यांनी यश मिळविले.
शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद कुबल, शिक्षिका वेदिका दळवी आणि प्रतिभा केळूसकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे आणि रानभाज्यांचे महत्त्व समजून घेण्याच्या वृत्तीचे कौतुक केले. याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी, ‘पावसाळ्यात निसर्गात सहज उपलब्ध होणाऱ्या या रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व अनन्यसाधारण आहे. नव्या पिढीने आपल्या या पारंपरिक व पौष्टिक खाद्यसंस्कृतीचे जतन केले पाहिजे,’ असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com