रत्नागिरी ः महागाईचा फटका, कारागिरांची टंचाई

रत्नागिरी ः महागाईचा फटका, कारागिरांची टंचाई
Published on

rat७p२०.jpg-
५५८४२
रत्नागिरी ः तालुक्यातील गणेशगुळे येथील चित्रशाळेत तयार झालेल्या गणेशमूर्ती.
--------------
महागाईचा फटका, कारागिरांची टंचाई
गणेश चित्रशाळांत लगबग ; कच्च्या मालापासून मजुरीपर्यंत सर्वच खर्च वाढला

एक नजर
* अधिक महिन्यामुळे मूर्तीकारांना अतिरिक्त कालावधी
* महागाईचे सावट पण उत्साह कायम
* कुशल कारागिरांच्या कमतरतेचा व्यवसायावर परिणाम

नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : गणेशोत्सवाला अद्याप सुमारे दोन महिन्यांचा अवधी असला तरी जिल्ह्यातील गणेश चित्रशाळांमध्ये मूर्ती घडवण्याच्या कामाला वेग आला आहे; मात्र, शाडू माती, प्लास्टर, रंग, सजावटीचे साहित्य आणि वाहतूक खर्चात झालेल्या वाढीमुळे यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातच कुशल कारागिरांची कमतरता आणि वाढलेल्या मजुरीमुळे मूर्तीकारांपुढे दुहेरी आव्हान उभे राहिले असून, वाढत्या खर्चाचा आणि मनुष्यबळाच्या टंचाईचा परिणाम यंदाच्या गणेशमूर्ती व्यवसायावर स्पष्टपणे जाणवत आहे. मूर्तींच्या किंमती १२०० वरून १८०० रुपयांवर पोचल्या आहेत. यावर्षी इंधनटंचाईमुळे महागाईत वाढ झाली असली तरीही गणेशभक्तांचा उत्साह कायम आहे.
अधिक महिन्यामुळे गणेशोत्सव यंदा उशिरा येणार आहे. गणेश चतुर्थीला अद्याप २ महिन्यांचा अवधी असून, जिल्ह्यातील गणेश चित्रशाळांमध्ये लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात घरोघरी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जात असल्याने मूर्तीकारांनी सुबक, आकर्षक आणि विविध रूपांतील गणेशमूर्ती घडवण्याचे काम वेगाने सुरू आहे. जिल्ह्यातील सुमारे १ हजार ३९५ गणेश चित्रशाळांमध्ये सध्या शाडूमाती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना अंतिम आकार देण्याचे काम सुरू आहे. काही चित्रशाळांमध्ये लहान मूर्तींचे रंगकाम पूर्ण झाले असून, आता मोठ्या आणि विशेष सजावटीच्या मूर्ती घडवण्यावर भर दिला जात आहे.
यंदा अधिक महिन्यामुळे गणेशोत्सव नेहमीपेक्षा उशिरा येत असल्याने मूर्तीकारांना मूर्ती तयार करण्यासाठी अतिरिक्त दिवस मिळाले आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे शेवटच्या टप्प्यात होणारी घाई काही प्रमाणात कमी झाली आहे. मूर्तीकारांनी सुरवातीला छोट्या घरगुती मूर्ती पूर्ण करण्यावर भर दिला असून, आता मोठ्या घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींना अंतिम स्वरूप दिले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी सुमारे १ लाख ६६ हजार ५८७ खासगी गणेशमूर्ती आणि ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे जिल्ह्यातील मूर्तीकारांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते.

चौकट
शाडूच्या मूर्तींना प्राधान्य
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढत असल्याने घरगुती गणेशोत्सवासाठी शाडूमातीच्या मूर्तींना प्राधान्य दिले जात आहे. पाण्यात सहज विरघळणाऱ्या आणि पर्यावरणाला तुलनेने कमी हानी पोहोचवणाऱ्या शाडूच्या मूर्तींसाठी अनेक भाविक आगाऊ नोंदणी करत आहेत. दुसरीकडे, प्लास्टरच्या मूर्ती वजनाने हलक्या, कमी वेळेत तयार होणाऱ्या आणि तुलनेने स्वस्त असल्याने त्यांची मागणीही वाढत आहे. विशेषतः मोठ्या आकाराच्या आणि आकर्षक सजावट असलेल्या मूर्तींसाठी प्लास्टरला पसंती दिली जाते. ग्राहकांच्या दोन्ही प्रकारच्या मागण्या लक्षात घेऊन अनेक चित्रशाळांमध्ये शाडू आणि प्लास्टर अशा दोन्ही प्रकारच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत.

चौकट
कुशल कारागिरांची कमतरता
जिल्ह्यातील मूर्तीकला व्यवसायासमोर कुशल कारागिरांची कमतरता ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. सध्या कुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध होत नसल्याचे मूर्तीकारांचे मत आहे. पूर्वी कारागिरांना प्रतिदिन सुमारे ३५० रुपये मजुरी मिळत होती. आता ही मजुरी वाढून ५०० ते ७०० रुपये प्रतिदिन झाली आहे. मजुरी वाढूनही अनेक ठिकाणी कारागीर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मूर्तिकारांना वेळेत काम पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घ्यावी लागत आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे काही लहान चित्रशाळांनी व्यवसाय बंद केला आहे. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली कला आणि व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी अनेक मूर्तीकार आर्थिक अडचणींचा सामना करत काम करत आहेत.

चौकट
मुंबईसह परदेशातही मूर्ती रवाना
जिल्ह्यात तयार होणाऱ्या गणेशमूर्तींना जिल्ह्याबाहेरूनही मोठी मागणी आहे. येथील मूर्ती मुंबई, सांगली, सातारा आणि कोल्हापूरसह राज्यातील विविध भागांत पाठवल्या जातात. काही आकर्षक आणि विशेष हस्तकलेतील मूर्ती परदेशात राहणाऱ्या कोकणवासियांकडूनही मागवल्या जात आहेत. मूर्तींची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी मजबूत पॅकिंग, लाकडी चौकट आणि विशेष वाहनांची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे परदेशात किंवा दूरच्या शहरांमध्ये मूर्ती पाठवताना वाहतूक आणि पॅकिंगचा खर्चही मूर्तीच्या किमतीत समाविष्ट केला जातो. गणेशमूर्ती तयार करण्याच्या व्यवसायामुळे ग्रामीण भागात हंगामी रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. माती तयार करणे, साचे बनवणे, रंगकाम, सजावट, पॅकिंग आणि वाहतूक अशा विविध कामांमधून अनेकांना रोजगार मिळतो. आर्थिक अडचणी, साहित्याची महागाई आणि कारागिरांची कमतरता असली तरी कोकणातील पारंपरिक मूर्तीकला टिकवण्यासाठी मूर्तीकारांची धडपड सुरू आहे.

कोट
55843
rat७p२१.jpg- ज्ञानेश कोटकर.

पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जिल्हात मूर्तीशाळांमध्ये प्लास्टरच्या मूर्तीऐवजी शाडू माती, कागदाच्या लगद्या, गोमय व लाल मातीचे गणपती दिसू लागले आहेत. यासाठी मूर्तीशाळेतील मूर्तीकार व्यवसाय वृद्धींगत आणि शाडूमातीचा उपयोग कमी प्रमाणात करून तसेच स्थानिक क्षेत्रात मिळणाऱ्या लाल मातीचा उपयोग करून मूर्ती तयार करत आहे. मूर्तीकारांनी ग्रामीण भागातही रोजगार निर्मिती केली आहे. श्री गणराया आता जिल्ह्यासह परदेशात जात आहेत
- ज्ञानेश कोटकर, मूर्तीकार, गणेशगुळे
---------
कोट
श्री गणेशाची मूर्ती वेगवेगळ्या रूपात तयार केली जातात; पण दरवर्षी एकाच प्रकारचा सुबक गणपती नेण्यात भक्ती दडलेली असते. अनेक गणेशभक्त वेगळेगळ्या स्वरूपात गणपती मूर्ती साकारून त्याचे पूजन केले जाते. अलिकडे हा ट्रेंड वाढला आहे; पण हे सर्व त्या त्या गणेशभक्ताच्या मनावर असते. काहींना मोठा गणपती हवा असतो तर काहींना बालमूर्ती हवी असते. गेल्या दोन वर्षात लालबागच्या राजाची केवळ दीड फुटाची मूर्ती चित्रशाळेतून घरी आणतो.
- नीलेश भागवत, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com