मराठा,ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही

मराठा,ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही
Published on

मराठा,ओबीसींवर अन्याय होणार नाही
उदय सामंत ः जरांगे पाटील यांचा गैरसमज दूर करणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : मराठा आरक्षण आणि मराठा समाजाचे ओबीसी दाखले रद्द होत असल्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत निर्माण झालेले गैरसमज संवादातून नक्कीच दूर केले जातील. सरकार मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
मनोज जरांगे पाटील यांच्याशी झालेल्या टेलिफोनिक संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रत्नागिरीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उदय सामंत म्हणाले, मराठा समाजाला दाखले देताना प्रशासकीय स्तरावर जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असेल तर त्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके या दोन्ही नेत्यांनी आपल्या मागण्या संवादाच्या माध्यमातून सरकारसमोर मांडाव्यात. मुख्यमंत्री या संपूर्ण स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच, या संदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशीही संवाद झाला आहे. महायुती सरकारने मराठा आरक्षणाबाबत घेतलेले निर्णय बदलण्याचा कोणताही प्रयत्न सरकारचा नाही आणि भविष्यातही असणार नाही, असे यापूर्वीच बावनकुळे यांनीही स्पष्ट केल्याचे सामंत म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी जाणीवपूर्वक काही गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत मंत्री उदय सामंत यांनी हे सर्व प्रयत्न अपयशी ठरतील, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, संघटनात्मक पदांचा व लोकप्रतिनिधींचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे आणि प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची असते, असे सामंत म्हणाले.
---
...आम्हाला न्याय मिळेल
शिवसेना कोणाची यावरून न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यावर उदय सामंत म्हणाले, यापूर्वी देखील अनेकांना आमच्याविरोधात निकाल जाईल, अशी परिस्थिती होती; परंतु तसे झाले नाही. आता त्यांच्या वकिलाने बाजू मांडली आहे. आमचे वकीलदेखील तेवढ्या ताकदीने आमची बाजू मांडतील. आम्हाला न्याय मिळेल यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.
----
... त्या संभाषणाबाबत संबंधितांवर कारवाई
माझ्याबद्दल चौधरी व अन्य व्यक्तीचे आक्षेपार्ह टेलीफोन संभाषण व्हायरल झाले आहे. हे कथित संभाषण असेल तर ठीक; परंतु याची चौकशी सुरू आहे. यामध्ये काही तथ्य निघाले तर संबंधित दोघांवर कायदेशीर कारवाई करणार. कोण कसा आहे, कसा निवडून आला हे मलादेखील माहीत आहे. योग्य वेळी ते प्रसारमाध्यमांसमोर आणू, असा इशारा मंत्री उदय सामंत यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com