सिंधुदुर्ग आजपासून तिरंगामय होणार!

सिंधुदुर्ग आजपासून तिरंगामय होणार!
Published on

सिंधुदुर्ग आजपासून तिरंगामय होणार!

‘हर घर तिरंगा’ अभियान; ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांचे स्मरण

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ८ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा ‘हर घर तिरंगा’ अभियान व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. ९ ते १७ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ यंदाचे अभियान समर्पित केले आहे. नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अभियानाच्या कालावधीत शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तिरंगा फडकविणे, तिरंगा सजावट व रोषणाई, देशभक्तीपर कार्यक्रम, तिरंगा रॅली, सायकल व ई-बाईक रॅली तसेच विविध प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करण्यासही प्रोत्साहन दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, युवक मंडळे, क्रीडा संस्था, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन तिरंगा सायकल व ई-बाईक रॅली आयोजित करावी, असे आवाहन केले आहे. या रॅलीमध्ये ऐतिहासिक स्थळे, स्वातंत्र्यसैनिक स्मारके आणि प्रमुख सार्वजनिक ठिकाणांचा समावेश करता येणार आहे. रॅलीच्या आयोजनावेळी वाहतूक व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. अभियानातील ‘तिरंगा सेल्फी’ हा महत्त्वाचा डिजिटल उपक्रम आहे. नागरिकांनी संकेतस्थळावर तिरंग्यासोबत सेल्फी अपलोड करून अभियानात सहभाग नोंदवावा. शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये व सार्वजनिक ठिकाणी तिरंगा तसेच ‘वंदे मातरम्’च्या इतिहासावर आधारित प्रदर्शनांचे आयोजन करून जनजागृती करावी. शासकीय इमारती, रुग्णालये, शाळा, प्रमुख चौक, रस्ते आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी तिरंगी रोषणाई व सजावट तसेच ‘वंदे मातरम्’च्या संकल्पनेवर आधारित तिरंगी रांगोळी काढण्याचे आवाहन केले आहे.
-------
नियमातील तिरंगे वापरणे आवश्यक!
अभियानासाठी आवश्यक तिरंग्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी स्वयं-सहायता गट आणि स्थानिक विक्रेत्यांमार्फत तिरंगा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्लास्टिकऐवजी भारतीय ध्वज संहितेतील नियमांचे पालन करणारे तिरंगे वापरणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नागरिक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, युवक, महिला बचतगट, स्वयंसेवी संस्था आणि विविध सामाजिक संघटनांनी अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होऊन देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com