

rat9p7.jpg-
56144
रत्नागिरी ः तालुक्यातील नेवरे-काजीरभाटी समुद्रकिनाऱ्यावर वाळूत अडकलेली चारचाकी.
नेवरे-काजीरभाटी किनाऱ्यावर स्टंटबाजी
भरतीच्या पाण्यात रुतली गाडी; चार तासांच्या प्रयत्नानंतर जेसीबीच्या मदतीने सुटका
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः तालुक्यातील प्रसिद्ध नेवरे-काजीरभाटी समुद्रकिनाऱ्यावर उत्साहाच्या भरात गाडी नेऊन स्टंटबाजी करणे पुण्याच्या पर्यटकांच्या अंगाशी आले. प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून किनाऱ्यावर नेलेली गाडी भरतीच्या पाण्यात खोलवर रुतल्याने पर्यटकांची मोठी धांदल उडाली. अखेर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘जेसीबी’च्या साहाय्याने ही गाडी बाहेर काढण्यात यश आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर वाहने नेण्यास प्रशासनाकडून कडक मनाई केली आहे. असे असतानाही पुण्यावरून फिरण्यासाठी आलेले काही पर्यटक नेवरे-काजीरभाटी किनाऱ्यावर थेट आपली गाडी घेऊन गेले. किनाऱ्यावर स्टंटबाजी सुरू असतानाच अचानक समुद्राला भरती आली. पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटकांची गाडी किनाऱ्यावरील मऊ वाळूत खोलवर रुतली. गाडी अडकल्याचे लक्षात येताच पर्यटकांनी ती बाहेर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले; मात्र प्रयत्नांऐवजी गाडी अधिकच वाळूत रुजत गेली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून पर्यटकांनी स्थानिक ग्रामस्थांकडे मदत मागितली. ग्रामस्थांच्या सल्ल्याने तातडीने जेसीबी पाचारण करण्यात आला. सुमारे चार तास चाललेल्या थरारानंतर जेसीबीच्या साहाय्याने गाडी वाळूतून सुरक्षित बाहेर काढण्यात आली. गाडी बाहेर निघताच पर्यटकांनी तेथून काढता पाय घेतला.
चौकट
कडक कारवाईची मागणी
दापोलीपाठोपाठ आता रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांवरही पर्यटकांकडून नियम मोडून वाहने नेणे आणि धोकादायक स्टंटबाजी करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. पर्यटकांच्या या बेजबाबदार कृत्यामुळे किनाऱ्यांचे सौंदर्य खराब होत असून अपघातांचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे अशा हुल्लडबाज पर्यटकांवर प्रशासनाने कडक गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी, अशी तीव्र मागणी नेवरे व परिसरातील स्थानिकांकडून केली जात आहे.
चौकट
कमी गर्दीच्या किनाऱ्यांकडे लक्ष
पावसाळ्यापुर्वी दापोली, रत्नागिरीसह विविध किनाऱ्यांवर पर्यटक चारचाकीचे स्टंट करीत असल्याचे पुढे आले होते. त्यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी विशेष लक्ष घालून काही महत्वाच्या व गर्दीच्या किनाऱ्यांवर जाणारे मार्ग स्थानिक ग्रामपंचायतीच्या सहकार्याने बंद केले होते. गजबजलेल्या किनाऱ्यांपेक्षा छोट्या कमी गर्दीच्या ठिकाणांकडे पर्यटक वळत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.