

शिवसेनेतर्फे शनिवारी
कुडाळात वृक्षारोपण
कुडाळ ः नगरसेवक मंदार शिरसाट आणि शिवसेना कुडाळ शहर यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशाच्या संरक्षणासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या माजी सैनिकांच्या हस्ते शहरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (ता. १५) सकाळी १०.३० वाजता केले आहे. देशासाठी बलिदान आणि सेवा देणाऱ्या माजी सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यावर्षीचे वृक्षारोपण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ‘एक झाड देशासाठी, एक झाड पर्यावरणासाठी’ हा संदेश देत शहरातील विविध प्रमुख आणि सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड केली जाईल. या कार्यक्रमाला कुडाळ शहर शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, स्थानिक नागरिक आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. कुडाळमधील पर्यावरणप्रेमी नागरिक आणि देशप्रेमी जनतेने या वृक्षारोपण मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक मंदार शिरसाट यांनी केले आहे.
......................
माजगाव रस्त्यावरील
‘तो’ खड्डा धोकादायक
सावंतवाडी ः सावंतवाडी-शिरोडा मार्गावर माजगाव-मोरडोंगरी येथे भाईसाहेब सावंत समाधीस्थळानजीक रस्त्यावर पडलेला भला मोठा खड्डा वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. विशेषतः या खड्ड्यात दुचाकी गेल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रात्रीच्यावेळी हा खड्डा चालकांना दिसत नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने तत्काळ पाहणी करून हा धोकादायक खड्डा बुजवावा, अशी मागणी चालक व ग्रामस्थांतून केली जात आहे.
---
सावंतवाडीत ३० ला
काव्यवाचन स्पर्धा
सावंतवाडी ः मागील ४१ वर्षे नियमितपणे सुरू असलेल्या आरती मासिकतर्फे दरवर्षीप्रमाणे विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धा आयोजित केली आहे. येथील श्रीराम वाचन मंदिर येथे ३० ऑगस्टला सकाळी १० वाजता ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धा गोवा व सिंधुदुर्ग मर्यादित असून १८ वर्षांवरील स्पर्धक भाग घेऊ शकतात. कविता स्वरचित असावी. विजेत्यांना स्पर्धेनंतर लगेच प्रमाणपत्र, ग्रंथभेट व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल. इच्छुकांनी आपली नावे उषा परब किंवा भरत गावडे यांच्याकडे २५ ऑगस्टपर्यंत द्यावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
----
तोंडवळीत १७ ला
दिंडी भजन स्पर्धा
आचरा ः तोंडवळी येथील श्री देव वाघेश्वर मंदिर येथे पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त श्री देव वाघेश्वर भक्त मंडळ यांच्यातर्फे १७ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता देखावायुक्त दिंडी नृत्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम पारितोषिक १० हजार, द्वितीय ७ हजार रुपये तसेच सहभागी संघांना मानधन देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.