

56379
रानभाज्यांच्या प्रदर्शनाला
बांद्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १० : पावसाळ्यात निसर्गाच्या सान्निध्यात उगवणाऱ्या विविध रानभाज्यांची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ओळख व्हावी, त्यांच्या पौष्टिक व औषधी गुणधर्मांची माहिती मिळावी आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने पीएमश्री जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं. १ येथे रानभाज्यांचे आकर्षक व भव्य प्रदर्शन भरविण्यात आले.
या प्रदर्शनात परिसरात आढळणाऱ्या विविध रानभाज्या विद्यार्थी व पालकांनी संकलित करून मांडल्या होत्या. रानभाज्यांचे औषधी गुणधर्म, उपयोग, तसेच त्यापासून तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या माध्यमातून निसर्गाशी नाते, जैवविविधतेचे संवर्धन, स्थानिक अन्नपद्धती आणि आरोग्यदायी आहाराचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. प्रदर्शनासोबतच रानभाज्यांच्या विक्रीचेही आयोजन करण्यात आले होते. या विक्रीला पालक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत खरेदी केली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना खरेदी-विक्री, नफा-तोटा आणि ग्राहकांना आकर्षित करण्याचे प्राथमिक व्यावहारिक ज्ञानही या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाल्याचे सांगितले. मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी स्थानिक साधनसंपत्तीचे महत्त्व जपण्याची गरज अधोरेखित केली. प्रत्यक्ष अनुभवातून निसर्ग आणि पर्यावरणाचा अभ्यास करण्याची संधी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक शांताराम असनकर, शिक्षक उदय सावळ, अर्चना देसाई, कृपा कांबळे, जागृती धुरी, रंगनाथ परब, कुणाली मस्के, फ्रान्सिस फर्नांडिस, मनीषा मोरे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.