खेड- रसाळगडावर फुलले पर्यटन

खेड- रसाळगडावर फुलले पर्यटन
Published on

rat10p1.jpg
56341
खेड ः धुक्यात हरवलेला रसाळगड पर्यटकांना भुरळ घालत आहे.
rat10p2.jpg-
56342
खेड ः किल्ल्यावरील तोफ.
------------
धुक्याच्या चादरीत न्हालेला रसाळगड पर्यटकांच्या पसंतीस
रघुवीर घाट अवजड वाहनांसाठी बंदच; शिवकालीन दुर्गचे पर्यटकांना आकर्षण, मुलभूत सुविधांचा अभाव
खेड, ता. १० : धुक्याची शुभ्र चादर... हिरव्यागार सह्याद्रीने पांघरलेला निसर्ग... डोंगरदऱ्यांतून वाहणारा थंड वारा आणि इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा असलेला रसाळगड ! रघुवीर घाट पावसाळ्यात दरडींच्या धोक्यामुळे पर्यटकांसाठी बंद झाल्यानंतर खेड तालुक्यातील हा शिवकालीन दुर्ग आता पर्यटकांना फिरण्यासाठी नवे ठिकाण बनला आहे. दर शनिवार-रविवारी इतिहासप्रेमी, दुर्गभ्रमंती करणारे युवक, छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमी रसाळगडावर दाखल होत आहेत.
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला रसाळगड हा केवळ एक किल्ला नसून स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रसद, धान्यसाठा आणि लष्करीदृष्टीने महत्त्वाचे केंद्र म्हणून या गडाचा वापर होत असे. आजही गडावरील मजबूत तटबंदी, बालेकिल्ला, धान्यकोठाराचे अवशेष, पाण्याचे तलाव, श्री झोलाई मंदिर, हनुमान मंदिर, घोड्यांची पाग आणि मावळ्यांच्या समाधी इतिहासाची साक्ष देतात. राज्य शासनाने २००४-०५ मध्ये रसाळगडाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देत संवर्धनासाठी कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता; मात्र, या कामांमध्ये अनियमितता, निकृष्ट दर्जाची कामे आणि ऐतिहासिक वास्तूंचे विद्रुपीकरण झाल्याचे आरोप आजही कायम आहेत. त्यामुळे किल्ल्याच्या संवर्धनाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी गडावर स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, माहितीफलक, विश्रांतीची सोय अशा मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. अनेक ऐतिहासिक तोफा आजही अस्ताव्यस्त अवस्थेत पडून आहेत. काही तोफा दुर्गप्रेमींनी सुरक्षित ठिकाणी एकत्र करून ठेवल्या असल्या तरी त्यांचे शास्त्रोक्त संवर्धन अद्याप झालेले नाही. हा किल्ला केवळ ‘वीकेंड डेस्टिनेशन’ न राहता कोकणातील प्रमुख दुर्गपर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकतो. त्यासाठी पुरातत्त्व विभाग, पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करून आवश्यक सुविधा उभारणे आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करणे अत्यावश्यक बनले आहे.

चौकट
ही आहेत रसाळगडची वैशिष्ट्ये
- राज्य संरक्षित शिवकालीन दुर्ग
- श्री झोलाई मंदिर व ऐतिहासिक वास्तू
- मजबूत तटबंदी आणि बालेकिल्ला
- पाण्याचे तलाव, धान्य कोठाराचे अवशेष
- सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसराचे विहंगम दर्शन
- पावसाळ्यात छायाचित्रकार आणि ट्रेकर्ससाठी आकर्षण

चौकट
प्रश्न अजूनही कायम
पर्यटन वाढत आहे; मात्र सुविधा नाहीत. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, माहिती केंद्र, सुरक्षा व्यवस्था, तोफांचे संवर्धन आणि किल्ल्याच्या देखभालीकडे संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा इतिहासाचा हा अमूल्य ठेवा केवळ दुर्लक्षाचा बळी ठरण्याची भीती दुर्गप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते संजय विचारे यांनी व्यक्त केली.

कोट
गडकिल्ल्यांचे संवर्धन ही काळाची गरज असून रसाळगड आणि गडाकडे जाणाऱ्या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी आम्ही राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून, लवकरच या बाबींची पूर्तता होईल.
- सचिन धाडवे, सदस्य, जिल्हा परिषद, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com