

डीबीजेत रानभाज्या महोत्सवाचे आयोजन
चिपळूण ः येथील डॉ. दातार विज्ञान, डॉ. बेहेरे कला आणि श्री पिलुकाका जोशी वाणिज्य महाविद्यालय, चिपळूण कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात रानभाजी पाककला, भित्तिपत्रक व रिल स्पर्धा घेण्यात येणार आहे. हा महोत्सव उद्या (ता. १३) डीबीजे महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. यामध्ये रानभाज्या प्रदर्शन, विक्री आणि रानभाजी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी अध्यक्ष मंगेश तांबे, प्राचार्य डॉ. माधव बापट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. योगेश आगवेकर, प्रा. स्वरदा कुलकर्णी, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्न करत आहेत.
सुसंस्कारित पिढी घडवण्यात
अंगणवाडी महत्त्वाची ः निकम
चिपळूण ः अंगणवाडीत केवळ पूर्वप्राथमिक शिक्षण दिले जात नाही तर बालकांच्या बौद्धिक, शारीरिक, भावनिक आणि सामाजिक विकासाला चालना दिली जाते. खेळ, कृती, गोष्टी, गाणी आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण केली जाते. त्यामुळे सक्षम आणि सुसंस्कारित पिढी घडवण्यामध्ये अंगणवाडी केंद्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी कोसबी येथे केले. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्र, कोसबी घाणेकरवाडी येथील नवीन अंगणवाडी इमारतीच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. या वेळी सभापती सूर्यकांत खेतले, सदस्या मनस्वी बैकर, शरद शिगवण, जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, विजय गुजर, केंद्रप्रमुख घडशी, कोकाटे गुरूजी, अंगणवाडी सेविका स्मिता वाडेकर, महेंद्र सुर्वे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
लांज्यातील रानभाजी महोत्सवाला प्रतिसाद
लांजा ः कृषी विभाग, आत्मा यांच्यातर्फे लांजा येथील कुलकर्णी-काळे छात्रालयात आयोजित रानभाजी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोकणातील पारंपरिक रानभाज्यांचे संवर्धन करणे, त्यांचे पौष्टिक व आरोग्यदायी महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे, स्थानिक महिला बचतगट व शेतकरी गटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच रानभाज्यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर उत्पन्नवाढीस चालना देणे हा या महोत्सवाचा उद्देश होता. या महोत्सवाचे उद्घाटन पंचायत समिती लांजाच्या सभापती मानसी आंबेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी पंचायत समिती सदस्य रसिका मेस्त्री, साक्षी चव्हाण, दीपाली साळवी, उपविभागीय कृषी अधिकारी रत्नागिरी फिरोज शेख, नायब तहसीलदार अनिल गोसावी, गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी, कृषी विज्ञान केंद्र देवधेचे प्रमुख डॉ. आनंद हनुमंते, नायब तहसीलदार दर्शन देसाई, तालुका कृषी अधिकारी अभिजित शेलार आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.