

पाळणेकोंड धरणाला
मुसळधारेची प्रतीक्षा
सावंतवाडी ः शहराला मुख्यत्वे पाणी पुरवठा करणारे पाळणेकोंड धरण ऑगस्ट उजाडला तरी पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. पावसाचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे पाळणेकोंड धरण अद्याप ‘ओव्हरफ्लो’ झाले नसून, धरणातील पाणी पातळी अजूनही एक मीटरने कमी आहे. आगामी काळात जर पावसाने ओढ दिली अथवा हंगाम कोरडा राहिला, तर येत्या उन्हाळ्यात सावंतवाडी शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाची चिंता वाढली आहे. दुसऱ्या बाजूला, सावंतवाडी शहरात ५७ कोटींच्या नवीन नळपाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असून, या कामातील विविध त्रुटी आणि संथ गतीमुळे आधीच नागरिकांना पाणीटंचाई तसेच रस्ते खोदाईच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता मुख्य जलस्रोत असलेले पाळणेकोंड धरणच पूर्ण न भरल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. येत्या दिवसांत मुसळधार पाऊस झाला नाही आणि धरणातील पाणी पातळी पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचली नाही, तर नगरपरिषदेला उर्वरित वर्षात शहराचा पाणी पुरवठा नियोजनबद्ध ठेवताना मोठी कसरत करावी लागणार आहे.
------
वरवडे हायस्कूलतर्फे
सुगम संगीत स्पर्धा
कणकवली ः ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, वरवडे आणि डॉ. राजअहमद हुसेनशाह पटेल चॅरिटेबल ट्रस्ट, हरकुळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रावणधारा’ जिल्हा मराठी सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धक भावगीत, भक्तिगीत, गझल किंवा अभंग यापैकी कोणतेही एक गीत सादर करू शकतात. स्पर्धेची प्रारंभिक प्रथम फेरी २३ ऑगस्टला सकाळी १० वाजता, अंतिम फेरी २९ ला सकाळी ९ वाजता आयडियल इंग्लिश स्कूल, वरवडे येथे होईल. ही स्पर्धा तीन गटांमध्ये होणार असून पहिला गट पाचवी ते आठवी, (वयोगट ११ ते १४ वर्षे), गट दुसरा नववी ते बारावी (वयोगट १५ ते १८ वर्षे) व तिसरा खुला गट असून तिन्ही गटांमधून प्रथम तीन क्रमांकांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी २० ऑगस्टपर्यंत करावी, असे आवाहन केले आहे.
--------
वेंगुर्लेत पालिकेतर्फे
जनजागृती उपक्रम
वेंगुर्ले ः शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार येथील नगरपरिषदेतर्फे ११ ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध देशभक्तीपर, सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन केले आहे. या अभियानांतर्गत नागरिक, विद्यार्थी, शाळा व महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व नगरसेवकांनी केले आहे. गुरुवारी (ता.१३) सकाळी १०.३० वा. वेंगुर्ले नगरपरिषद येथून तिरंगा रॅली, दुपारी २.३० वाजता ‘तिरंगा प्रश्नमंजुषा’, १४ ला सायंकाळी ७ वाजता नगरपरिषद येथे ‘फाळणी भयावहता स्मृती दिन’, कालेलकर नाट्यगृह येथे महिलांसाठी सकाळी १० वाजता रांगोळी स्पर्धा, १५ ला सकाळी ११ वाजता नगरपरिषद येथे सांस्कृतिक कार्यक्रम व वंदे मातरम् गीतगायन आयोजित केले आहे.
.........................
कळणेत रविवारी
रक्तदान शिबिर
बांदा ः जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये निर्माण झालेली रक्ताची टंचाई कमी करण्यासाठी ‘माऊली बॉईज, कळणे’ यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला असून, स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने रविवारी (ता. १६) कळणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर माऊली बॉईज कळणे व ऑन कॉल रक्तदाते सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. जिल्ह्यात वाढत्या रक्तटंचाईची समस्या लक्षात घेऊन हे शिबिर आयोजित केले आहे. अधिकाधिक रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, तसेच गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी बाळानंद देसाई, संकेत देसाई, सिद्धू परब, सुहास देसाई यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
------
बांदा येथे आज
समूहगीत स्पर्धा
बांदा ः स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रशाळा, बांदा क्र. १ च्या वतीने अंगणवाडीतील ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी ‘चिमुकल्या स्वरांतून देशभक्तीचा जयघोष’ या देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे आयोजन उद्या (ता. १३) सकाळी ११ वाजता केले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून बालकांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सहभागी बालकलाकारांना देशभक्तीपर गीतांद्वारे कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेनंतर सन्मानपत्र तसेच बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे.
---
दोडामार्गात शनिवारी
भव्य तिरंगा यात्रा
दोडामार्ग ः आजी-माजी सैनिक संघटना, दोडामार्ग यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारी (ता. १५) तालुक्यात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीमध्ये तालुक्यातील सर्व आजी-माजी सैनिक, सैनिक परिवार, नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका माजी सैनिक संघटनेने केले आहे. ही तिरंगा रॅली सकाळी १० वाजता तहसीलदार कार्यालय येथून सुरू होऊन गणेश मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.