

56827
‘शिक्षक भरतीत ६०:४० फॉर्म्युला वापरा’
शिक्षण समितीत ठराव; स्थानिक उमेदवारांना प्राधान्याचा आग्रह
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १२ : पवित्र पोर्टलद्वारे जिल्हा परिषदेत होणाऱ्या सुमारे २८० शिक्षकांच्या भरतीत जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळावे, यासाठी ६०:४० टक्के स्थानिक निकष लागू करावा, असा ठराव आजच्या शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला. सिंधुदुर्ग हा डोंगराळ जिल्हा असल्याने शिक्षक भरतीत स्थानिक उमेदवारांचा विचार होणे आवश्यक आहे, अशी भूमिका सदस्यांनी मांडली. नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीद्वारे जिल्ह्याबाहेर जाता येऊ नये, यासाठीही शासनाकडे ठराव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा परिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली आज ही सभा झाली. प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता परब, सदस्य विक्रांत सावंत, गुरुनाथ पेडणेकर, नितीन राऊळ, प्राची इस्वलकर, यज्ञा साळगावकर, संतोष वारंग, अनंत फोंडके, प्रमोद रावराणे, अवनी तेली, अपर्णा सातोसकर आदी उपस्थित होते.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषद शिक्षकांची सुमारे २८० पदे भरली जाणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील किमान ८० टक्के उमेदवारांना संधी मिळावी, अशी अपेक्षा सभेत व्यक्त केली. मात्र, शिक्षक पात्रता परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे भरती होत असल्याने स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यास मर्यादा असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यावर सिंधुदुर्गची भौगोलिक परिस्थिती आणि डोंगराळ स्वरूप विचारात घेऊन शिक्षक भरतीसाठी ६०:४० टक्क्यांचा स्थानिक निकष लागू करण्याची मागणी शासनाकडे करण्याचा ठराव घेण्यात आला. नव्याने नियुक्त होणारे शिक्षक काही काळ सेवा केल्यानंतर आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्याबाहेर गेल्यास पुन्हा शिक्षकांची पदे रिक्त होतात. त्यामुळे नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्याबाहेर जाता येऊ नये, यासाठीही ठराव घेण्यात आला.
उंबर्डे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय राठोड हे ४८ तास कारागृहात राहिल्याचा मुद्दा सभेत पुन्हा उपस्थित झाला. त्यांना निलंबित करण्याबाबत संबंधित संस्थेला पत्र दिले असून, त्यांनी कारवाई न केल्यास संस्थेविरुद्ध कारवाई केली जाईल, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी पाटील यांनी दिली. कारागृहातून सुटल्यानंतर त्यांची मिरवणूक काढून त्यांना पुन्हा मुख्याध्यापकांच्या खुर्चीवर बसविल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. हा विषय सलग चार सभांमध्ये चर्चेला आला असून, आता यापुढे पुन्हा हा विषय काढणार नसल्याचे सदस्य प्रमोद रावराणे यांनी सांगितले.
----
‘विषयांचा अभ्यास करून सभेला या’
जिल्ह्यातील ३१ शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी शिक्षण विभागाने त्यांची यादी बांधकाम विभागाला दिली आहे. मात्र, सभेला उपस्थित असलेल्या बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना याबाबत माहिती नसल्याचे चर्चेत समोर आले. त्यामुळे सभापती राऊळ संतप्त झाले. ‘‘केवळ सभेला यायचे म्हणून येऊ नका. विषयांचा अभ्यास करून सभेला या,’’ अशा शब्दांत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावले.
---
‘त्या’ शिक्षकाचे निलंबन गरजेचे
मडुरा परिसरातील एका शिक्षकावर आरोप झाले आहेत. संबंधित शिक्षकाचे निलंबन होणे गरजेचे असल्याची भूमिका सभापती राऊळ यांनी मांडली. माध्यमिक शिक्षणाधिकारी पाटील यांनी स्वतः शाळेला भेट देऊन मुख्याध्यापकांशी चर्चा करावी. आवश्यकता भासल्यास या प्रकरणाचा अहवाल शिक्षण उपसंचालकांकडे पाठवावा, असे निर्देशही त्यांनी दिले. वायंगणी शाळा क्रमांक २ येथे सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याच्या प्रस्तावाला सभेत मंजुरी देण्यात आली.
---
शासनाच्या अभिनंदनाचा ठराव
विविध ठिकाणी प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द करून त्यांना मूळ पदावर परत बोलावण्याचे निर्देशही दिले. समग्र शिक्षा अभियानातील ४७ कर्मचाऱ्यांना कायम केल्याबद्दल राज्य शासनाच्या अभिनंदनाचा ठराव सभेत घेतला. यावेळी परिविक्षाधीन मालवणचे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कोथमिरे, वेंगुर्लेचे गटशिक्षणाधिकारी अजय ढाणे, निमंत्रित तज्ज्ञ शिक्षक गुरुनाथ पेडणेकर तसेच शिक्षक प्रतिनिधी संतोष वारंग, अनंत फोंडके यांचे स्वागत करण्यात आले.
......................
‘एआय’ शिक्षणावर भर
राज्य शासनाने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एआय-आधारित विविध अभ्यासक्रम उपलब्ध केले आहेत. त्याचे ज्ञान जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना देऊन त्यांना अत्याधुनिक शिक्षणाशी जोडले पाहिजे, अशी सूचना विक्रांत सावंत यांनी केली. यावर जिल्हा शैक्षणिक गुणवत्तेत सध्या दुसऱ्या क्रमांकावर असून तो पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी शिक्षण विभागाने नवनवीन संकल्पना आणि उपक्रम सुचवावेत व त्याचा अहवाल पुढील सभेत सादर करावा, असे निर्देश सभापती राऊळ यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.