

सीसीटीव्ही नसतील तर केंद्र बंद!
दहावी-बारावीच्या परीक्षा; मंडळाचा कठोर निर्णय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या १०वी व १२वीच्या परीक्षा पारदर्शक आणि पूर्णतः गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी कोकण विभागीय मंडळाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १७५ परीक्षा केंद्रांच्या तपासणीचे व पुनर्रचनेचे काम सुरू केले आहे. यामध्ये केंद्रांवरील प्रत्येक वर्गखोलीत कार्यान्वित सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नसतील, ती केंद्रे कोणतीही गय न करता थेट बंद करण्यात येणार आहेत.
विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार कोकण विभागीय मंडळाच्या अखत्यारित १०वीची ११४ आणि १२वीची ६१ अशी एकूण १७५ परीक्षा केंद्रे कार्यरत आहेत. कोकण विभागीय मंडळातील सर्वच केंद्रांना विभागीय मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन बारीक पाहणी करणार आहेत. यापूर्वी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. आता मंडळ अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत पथके तपासणी करत आहेत. १०वीची रत्नागिरी जिल्ह्यात ७३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४१ अशी एकूण ११४ परीक्षा केंद्रे आहेत तर १२वीची रत्नागिरी जिल्ह्यात ३८ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ अशी एकूण ६१ परीक्षा केंद्रे आहेत. परीक्षेचे नियोजन वेळेत पूर्ण करण्यासाठी मंडळाने या संपूर्ण तपासणी प्रक्रियेसाठी २० ऑगस्ट ही अंतिम मुदत आखून दिली आहे. या कालावधीत सर्व १७५ केंद्रांची काटेकोर तपासणी करून वस्तुनिष्ठ अहवाल विभागीय मंडळाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी विभागीय मंडळ स्तरावर सचिवांसह मंडळ अधिकारी कर्मचाऱ्यांची १६ पथके प्रत्यक्ष क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मदतीने दोन्ही जिल्ह्यात तपासणी करत आहेत.
----
कोट
ज्या केंद्रांवर सीसीटीव्ही आणि भौतिक सुविधांचा अभाव आहे तिथे परीक्षा घेणे अशक्य आहे. शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतः केंद्रांना भेटी देऊन वस्तुस्थितीदर्शक अहवाल द्यावा. त्रुटी असतानाही केवळ सोय म्हणून एखादे केंद्र सुरू ठेवण्याची शिफारस केली आणि पुढे तिथे गैरप्रकार किंवा विद्यार्थ्यांची गैरसोय झाली तर शिफारस करणाऱ्या अधिकाऱ्यालाही थेट जबाबदार धरून त्याच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
-राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, कोकण विभागीय मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.