आंबोली धबधबा परिसरात पार्किंग नको

आंबोली धबधबा परिसरात पार्किंग नको
Published on

swt1213.jpg
56830
सावंतवाडी ः आंबोलीतील वाहतूक नियोजनाबाबत बबन साळगावकर यांनी पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याशी चर्चा केली.
आंबोली धबधबा मार्ग कोंडीमुक्त ठेवा
बबन साळगावकर ः वाहतूक नियोजनाबाबत यंत्रणेशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत शनिवार, रविवारी पर्यटकांची होणारी गर्दी आणि त्यामुळे उद्भवणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता धबधब्याच्या परिसरातील किमान पाच किलोमीटरचा रस्ता वाहतूक कोंडीविरहित राहण्यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न करा. जेणेकरून अत्यावश्यक वेळी वाहतुकीला अडथळा होऊ नये, अशी मागणी आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह शिष्टमंडळाने पोलिस निरिक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे केली.
श्री. साळगावकर यांनी आज पोलिस निरीक्षक मगदूम यांची पोलिस ठाण्यात भेट घेतली. यावेळी विशेष करून आंबोलीतील वाहतूक कोंडी संदर्भात आणि त्या ठिकाणी होणाऱ्या अपघाताबाबत सविस्तर चर्चा करत उपाययोजनांची मागणी केली. श्री. साळगावकर यांच्या मागणीनुसार, आंबोलीमध्ये शनिवार-रविवार दोन दिवस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी उद्भवते. येणारे पर्यटक मोठ्या आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा स्थितीत पार्किंग करतात. त्यामुळे अत्यावश्यक परिस्थितीमध्ये एखाद्या रुग्णाला बेळगाव केएलईसारख्या ठिकाणी जायचे असल्यास मोठी समस्या निर्माण होते. त्याला वेळीच उपचार मिळू शकत नाहीत. त्यामुळे किमान धबधबा परिसरातील पाच किलोमीटरचा रस्ता शनिवार-रविवार या दोन दिवसांमध्ये वाहतूक कोंडी विरहित राहावा, यासाठी वेगळी उपाययोजना राबवावी. आंबोली येथे दोन दिवसांपूर्वी धबधब्याच्या ठिकाणी सर्पदंश झालेल्या एका पर्यटकाला वाहतूक कोंडीचा फटका बसून वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. यावरही साळगावकर यांनी बोट ठेवले. मात्र, संबंधित पर्यटकांचा मृत्यू वाहतूक कोंडीमुळे झाला नसल्याचे स्पष्टीकरण पोलिस निरीक्षक श्री. मगदूम यांनी दिले. त्या पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला कोणताही अडथळा निर्माण झाला नाही, असेही, ते म्हणाले.
आंबोलीत येणारे पर्यटक हे अतिउत्साही तसेच मद्यधुंद असतात. त्यांना आवरणे पोलिसांनाही शक्य नाही. एखाद्या वेळी कारवाईचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केल्यास चुकीच्या पद्धतीचा व्हिडिओ शूटिंग करून तो प्रसारित केला जातो. त्यामुळे पोलिसांची बदनामी होते. दुसरीकडे सावंतवाडी पोलिस ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. सद्यस्थितीत अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बळावर आंबोली वर्षा पर्यटनाची सुरक्षितता सांभाळावी लागत आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे, अभिमन्यू लोंढे, माजी नगरसेवक विलास जाधव यांनीही सूचना केल्या.

चौकट
ग्रामपंचायतीच्या सहकार्याची गरज
शनिवार, रविवारी दोन दिवस वाहतूक केला अडथळा ठरणारी अवजड वाहने रोखण्यात यावी. संबंधित ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन पार्किंगबाबत निर्णय घेतल्यास यावर मार्ग निघू शकतो, असे साळगावकर यांनी सांगितले. यावर संबंधित ग्रामपंचायतीकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याची नाराजी मगदूम यांनी बोलून दाखवली. वनविभागाचे कर्मचारी सुद्धा फक्त धबधब्याच्या परिसरामध्येच तैनात असतात, असे ते म्हणाले. तरी सुद्धा वाहतूक कोंडीबाबत आपण सुचवलेल्या सूचनानुसार योग्य ते नियोजन करू, असे मगदूम म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com