

57128
कलमठमध्ये स्त्रीशक्तीचा अनोखा सन्मान
विधवा प्रथा न पाळणाऱ्या ठाकूर यांच्या हस्ते ध्वजवंदन
कणकवली, ता. १३ : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभर ‘हर घर तिरंगा’ अभियान उत्साहात साजरे होत असताना, कलमठ ग्रामपंचायतीने ‘हर घर तिरंगा, हर नारी सन्मान’चा संदेश देत स्त्रीशक्तीचा अनोखा सन्मान केला. कलमठ ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आज पहिल्या दिवसाच्या ध्वजवंदनाचा मान तृप्ती आशुतोष ठाकूर यांना देण्यात आला.
कलमठ ग्रामपंचायत दरवर्षी गावातील विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या व्यक्तींना ध्वजवंदनाचा मान देते. यापूर्वी गुणवंत विद्यार्थी, सफाई कर्मचाऱ्यांसह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना हा सन्मान दिला आहे. वीस दिवसांपूर्वी तृप्ती ठाकूर यांच्या पतीचे निधन झाले. मात्र त्यांनी विधवा प्रथा न पाळता स्त्री सन्मानाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या या भूमिकेचा गौरव म्हणून ग्रामपंचायतीने त्यांना ध्वजवंदनाचा पवित्र मान दिला.
यावेळी सरपंच संदीप मेस्त्री म्हणाले, कलमठ ग्रामपंचायत नेहमीच ‘महिला स्नेही गाव’ म्हणून विविध उपक्रम राबवत आहे. ग्रामपंचायतीने विधवा प्रथेला विरोध करणारा ठराव घेतला असून, विधवा प्रथा न पाळणाऱ्या महिलांसाठी घरपट्टी माफ करण्याचा निर्णयही घेतला आहे. ‘हर घर तिरंगा, हर नारी सन्मान’ हा संदेश देत याच भूमिकेला अनुसरून ठाकूर यांना ध्वजवंदनाचा मान दिला.
विधवा प्रथा न पाळता आत्मसन्मानाने जीवन जगणाऱ्या महिलांच्या सोबत आणि पाठीशी कलमठ गाव कायम राहील, असा संदेश आजच्या उपक्रमातून देण्यात आला. खऱ्या अर्थाने स्त्री स्वातंत्र्य आणि सन्मान जपण्याचा ग्रामपंचायतीचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे सरपंचांनी सांगितले.
यावेळी मुख्याध्यापक मधुरा सावंत यांच्या हस्ते ठाकूर यांचा सन्मान करण्यात आला. उपसरपंच रवींद्र यादव, मुख्याध्यापक मधुरा सावंत, ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार, श्रेयस चिंदरकर, इफत शेख, स्वाती नारकर, विद्या लोकरे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.