‘इको सेन्सिटिव्ह’मधून दोडामार्गला वगळणे चूक

‘इको सेन्सिटिव्ह’मधून 
दोडामार्गला वगळणे चूक
Published on

57281

‘इको सेन्सिटिव्ह’मधून
दोडामार्गला वगळणे चूक

‘वनशक्ती’चे पर्यावरण प्रधान सचिवांना पत्र; मसुदा अधिसूचना सुधारण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १४ : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पश्चिम घाट इको-सेंसिटिव्ह एरियाच्या मसुदा अधिसूचनेत महाराष्ट्राचे ॲमेझॉन म्हणून ओळख असलेला दोडामार्ग तालुका वगळून घोर चूक केली आहे. आधीच रिअल इस्टेट माफिया येथील पर्यावरणावर नांगर फिरवत आहेत. त्यामुळे वेळीच हस्तक्षेप करून ही चूक सुधारावी, असे पत्र वनशक्ती संस्थेने केंद्रीय पर्यावरण प्रधान सचिव जयश्री भोज यांना पाठवले आहे.
पश्चिम घाट इको सेन्सिटिव्ह गावांबाबत अधिसूचना केंद्रातर्फे नुकतीच जारी करण्यात आली. यात पूर्ण दोडामार्ग तालुका वगळण्यात आला. वास्तविक कोकणातील सर्वाधिक पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून या तालुक्याकडे पाहिले जाते. या आधी वनशक्ती संस्थेने या तालुक्यातील काही गावे वाघाचा कॉरिडॉर असल्याने दीर्घ न्यायालयीन लढा देत इको सेन्सिटिव्ह करून घेतली आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वनशक्ती संस्थेने दोडामार्गच्या पर्यावरण संवर्धनासाठी पाऊल उचलले आहे. केंद्राच्या पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज यांना पाठवलेल्या पत्रातील आशय असा: पश्चिम घाटातील, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगले आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आपल्या हस्तक्षेपाची मागणी करण्यासाठी हे पत्र लिहीत आहोत. सावंतवाडी-दोडामार्ग वन्यजीव कॉरिडोर (मार्ग) हा सह्याद्री-कोकण वन्यजीव कॉरिडोरचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. सावंतवाडी आणि दोडामार्ग हे दोन्ही तालुके दाट जंगलांनी समृद्ध असून येथे मोठ्या प्रमाणावर वन्यजीव आहेत. दोडामार्गमध्ये विशेषतः अधिक दाट जंगले आणि वन्यजीवांची घनता जास्त आहे. तेरेखोल सारख्या आंतरराज्य नद्या आणि त्यांच्या उपनद्या या जंगलांमधून उगम पावून गोव्यात वाहतात.
२०२० मध्ये दोडामार्ग तालुक्यातील ‘तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र’ अधिसूचित केले होते. या राखीव क्षेत्रात दोडामार्गचा मोठा भाग समाविष्ट आहे. याला पश्चिम घाटाचे ‘ॲमेझॉन’ असेही म्हटले जाते. ‘वनशक्ती’ संस्थेने कायदेशीर लढा देऊन दोडामार्ग आणि सावंतवाडीतील काही गावे ‘इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया’ (ESA - पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र) म्हणून अधिसूचित करण्यासाठी १० वर्षांहून अधिक काळ संघर्ष केला आहे. हे कार्य मा. मुंबई उच्च न्यायालयाने २०१४ च्या जनहित याचिका क्र. १९८ मध्ये दिलेल्या आदेशानुसार केले होते.
पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे सादर केलेल्या ESA गावांच्या यादीतील चूक तातडीने दुरुस्त करण्याची विनंती करणे हा या पत्राचा उद्देश आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, पश्चिम घाट पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र अधिसूचना प्रक्रियेअंतर्गत या विभागाकडून जारी करण्यात आलेल्या सर्व मसुद्यांमधून संपूर्ण दोडामार्ग तालुका स्पष्टपणे वगळण्यात आला आहे. आम्ही जनहित याचिकेतही हा मुद्दा उपस्थित केला होता, परंतु राज्य सरकारने या विशिष्ट मुद्द्यावर उत्तर न देणे पसंत केले. राज्य वन विभागाने दोडामार्गमधील ग्रामस्थांना वन्यजीवांच्या संघर्षामुळे झालेल्या जीवित आणि शेतजमिनीच्या नुकसानीपोटी लाखो रुपयांची भरपाई दिली आहे.
----
६७ टक्के पेक्षा जास्त वनक्षेत्र
दोडामार्ग हा गोव्यातील भीमगड-अंशा आणि म्हादई अभयारण्यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. ३५ पेक्षा जास्त पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील गावे आणि ६७ टक्के पेक्षा जास्त वनक्षेत्र असूनही, हा संपूर्ण तालुका कोणत्याही कायदेशीर संरक्षणापासून वंचित ठेवला आहे. हे वगळणे ही एक प्रचंड मोठी चूक असून त्यात तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे. पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने जारी केलेल्या मसुदा अधिसूचनेत दोडामार्गचा समावेश करण्यासाठी आवश्यक ते निवेदन जारी करावे, अशी विनंती ‘वनशक्ती’ने या पत्राद्वारे केली आहे.
----------
पुन्हा कायदेशीर लढ्यात उतरायला लावू नका
दोडामार्ग या जागतिक जैवविविधता हॉटस्पॉटच्या संवर्धनाच्या दृष्टीने, आपणास ही चूक दुरुस्त करून दोडामार्गमधील तालुका आणि गावांचा यादीत समावेश करावा.आम्हाला आशा आहे की हा मुद्दा आपल्या स्तरावर सहजरीत्या सोडवला जाईल आणि जंगलांच्या संरक्षणासाठी पुन्हा दीर्घ कायदेशीर लढ्यात उतरावे लागणार नाही. आधीच रिअल इस्टेट माफिया दोडामार्गचा विनाश करत असून टेकड्या सपाट करत आहेत आणि गुंतवणूक टाऊनशिप्स व रिसॉर्ट्स बनवण्यासाठी जंगले नष्ट करत आहेत, ज्यामध्ये स्थानिक ग्रामस्थांना कोणताही रस नाही. त्यामुळे दोडामार्गची गावे आणि जंगलांचा समावेश असलेला नवीन मसुदा जारी करावा आणि तो शुद्धिपत्रक म्हणून प्रसिद्ध करावा, अशी मागणी वनशक्ती संस्थेने पर्यावरणाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.
------------------
कोट
दोडामार्ग तालुका पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातून वगळण्याचा प्रकार याआधीही घडला होता. त्याबाबत पश्चिम घाट अभ्यास समितीचे प्रमुख डॉ. माधव गाडगीळ यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्याच्या लेखी पत्रांच्या प्रती आमच्याकडे आहेत. डॉ. गाडगीळ यांनी आम्हाला पत्राद्वारे कळवले होते की, राज्य सरकारने सावंतवाडी तालुक्याचे जुने नकाशे दिले होते. हे नकाशे दोडामार्ग तालुका निर्मितीच्या आधीचे असल्याने त्यात या तालुक्याच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे ही चूक झाली आहे.
- स्टॅलिन डी, संचालक, वनशक्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com