

57303
तोंडवळीतील भूमिगत वीजवाहिनी रखडली
मालवण पंचायत समिती सभेत नाराजी; महावितरणने प्रस्ताव देण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १४ : भूमिगत वीजवाहिन्या प्रकल्प राबविण्यासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून तालुक्यातील तोंडवळी गावाची निवड झाली खरी मात्र, वनविभागाच्या परवानगीअभावी ६३० मीटरच्या भागात गेल्या तीन वर्षांत खोदाई झालेली नाही. महावितरणने आवश्यक प्रस्तावच वनविभागाकडे न पाठविल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर झालेल्या चर्चेत आचऱ्याच्या महावितरण विभागाने एका महिन्याच्या आत वनविभागास प्रस्ताव सादर करून वीजपुरवठा करावा, असा आदेश सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी आज झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत केला.
येथील पंचायत समितीची मासिक सभा सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती घनश्याम झाड, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण, छोटू ठाकूर, गणेश तोंडवळकर, मानसी भोगावकर, रिया बावकर, माधुरी मसुरकर, संतोष गावडे, दीपक सुर्वे आदी उपस्थित होते.
सभेत तोंडवळी गावातील वीजपुरवठ्याचा प्रश्न गणेश तोंडवळकर यांनी उपस्थित करत मागील तीन सभांमध्ये या विषयावर चर्चा केली जात असतानाही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यावेळी झालेल्या चर्चेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी महावितरणकडून कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही, असे स्पष्ट केले. भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याच्या पायलट प्रोजेक्टमध्ये या गावाचा समावेश असताना गेली तीन वर्षे हे काम रखडले आहे असे सरपंच आबा कांदळकर यांनी सभागृहात सांगितले. यावर आचरा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एका महिन्याच्या आत वनविभागास प्रस्ताव सादर करून तोंडवळी गावात वीजपुरवठा सुरू करावा, असा आदेश सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी दिला.
सभेच्या सुरुवातीस शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. नवीन होऊ घातलेल्या शिक्षक भरतीत तालुक्याला जास्तीत जास्त शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशा मागणीचा ठराव घेण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मार्गदर्शक फलक बसविले जातील, असे आश्वासन दिले. मात्र, चार बैठका होऊनही त्याची कार्यवाही न झाल्याने पंचायत समिती सदस्या मानसी भोगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर बांधकामच्या अधिकाऱ्यांनी आज सायंकाळपर्यंत फलक बसविला जाईल असे स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी ॲक्वागार्ड मशीन बसविण्याची तरतूद करण्यात यावी, असा ठरावही यावेळी घेण्यात आला. ग्रामसभेचे निमंत्रण त्या त्या ग्रामपंचायतीने पंचायत समिती सदस्यांना द्यावे, अशा सूचना सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी दिल्या. लाखो रुपये खर्च करून आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात आली. मात्र सद्यस्थितीत या इमारतीला गळती लागली आहे. त्याची दुरुस्ती केव्हा होणार असा प्रश्न सदस्य दीपक सुर्वे यांनी उपस्थित केला. यावर येत्या चार दिवसांत हे काम पूर्ण करून घेतले जाईल, असे बांधकामच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आचरा पशू वैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचीही दुरवस्था झाली असून गळतीमुळे डॉक्टरांनाही तेथे बसणे मुश्कील झाले आहे. याबाबतची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
-------
कनिष्ठ अभियंत्यावर अतिरिक्त कार्यभार नको
पंचायत समितीसाठी नियुक्त झालेल्या कनिष्ठ अभियंत्यावर कोणताही अतिरिक्त कार्यभार सोपवू नये, असा ठराव सभेत घेण्यात आला. तालुक्यातील घरकुलची कामे रखडली आहेत. ही कामे संबंधित कनिष्ठ अभियंत्याने पूर्ण करून घ्यावीत असे संतोष गावडे, दीपक चव्हाण यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.