

57304
अमली पदार्थांना ठामपणे ‘नाही’ म्हणा
रेश्मा भाईप : सिंधुदुर्गनगरी येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १४ : व्यसनाची सुरुवात अनेकदा उत्सुकता, चुकीची संगत आणि मित्रांच्या दबावातून होते. ''एकदा करून बघ, काही होत नाही'' या आग्रहाला बळी न पडता अमली पदार्थांना ठामपणे ''नाही'' म्हणण्याची हिंमत विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. एखाद्याने जबरदस्तीने व्यसनकारक पदार्थ देण्याचा प्रयत्न केल्यास गप्प न राहता पालक, शिक्षक, पोलिस किंवा विश्वासू व्यक्तीची मदत घ्यावी, असे आवाहन मनोविश्लेषक तज्ज्ञ रेश्मा भाईप यांनी केले.
''नशामुक्त भारत'' अभियानांतर्गत सिंधुदुर्गनगरी येथे सिंधुदुर्ग पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भाईप यांनी उत्सुकता, ''पीअर प्रेशर'', चुकीची संगत तसेच व्यसनाचे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक व सामाजिक परिणाम याबाबत संवाद साधला. किशोरवयात नवीन गोष्टी करून पाहण्याची उत्सुकता अधिक असते. मात्र उत्सुकतेपोटी केलेली सुरुवात पुढे सवय आणि व्यसनात बदलू शकते. त्यामुळे मित्रांचा गट चुकीच्या गोष्टींकडे नेत असल्याचे जाणवल्यास वेळीच त्या संगतीपासून दूर व्हावे. मोबाईल व सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अभ्यास, मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक जीवनावर परिणाम होत असल्यास त्याकडेही गांभीर्याने पाहावे. ''नो ड्रग्स, मला व्यसनमुक्त राहायचे आहे'' हा निर्धार प्रत्येकाने स्वतःपासून करावा, असे भाईप यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्गचे अधिष्ठाता (अतिरिक्त कार्यभार) डॉ. अनंत डवंगे यांनी व्यसनकारक पदार्थ ‘एकदा करून पाहण्याची’ उत्सुकताच पुढे व्यसनाची पहिली पायरी ठरू शकते, असे सांगितले. व्यसन लागल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यापेक्षा त्याच्या दिशेने जाणारी पहिली पायरीच टाळणे अधिक महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांबाबत जागरूक राहून कोणतीही अनोळखी किंवा संशयास्पद वस्तू स्वीकारण्यापूर्वी पालक, शिक्षक अथवा जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यावा, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनाचा छंद जोपासावा, खेळ आणि कलेमध्ये सहभागी व्हावे तसेच एखाद्या विधायक गोष्टीबद्दल आवड निर्माण करावी. चांगल्या मित्रांची संगत चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवण्यास मदत करते. त्यामुळे वाचन, खेळ, विधायक छंद आणि चांगली संगत यांच्या माध्यमातून जीवन समृद्ध करून व्यसनाला आयुष्यात प्रवेशच होऊ देऊ नका, असा संदेश डॉ. डवंगे यांनी दिला.
--------------
आयुष्याचे स्टिअरिंग दुसऱ्याच्या हातात नको
अपर पोलिस अधीक्षक नयोनी साटम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ‘आयुष्याची गाडी’ हे उदाहरण देत मित्रांच्या दबावाला बळी न पडण्याचा संदेश दिला. गाडी चालवताना संकट दिसल्यास चालक स्वतः स्टिअरिंग वळवून ते टाळतो; त्याचप्रमाणे ड्रग्जचा धोका समोर आल्यास त्यापासून दूर जाण्याचा निर्णयही स्वतःच घेतला पाहिजे. मित्र-मैत्रिणी काहीही सांगतील; पण आयुष्य तुम्हाला जगायचे आहे. त्यामुळे आयुष्याचे स्टिअरिंग दुसऱ्याच्या हातात देऊ नका, असे त्या म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.