उपोषणाऐवजी प्रशासनाशी थेट संवाद साधा

उपोषणाऐवजी प्रशासनाशी थेट संवाद साधा
Published on

57352

उपोषणाऐवजी प्रशासनाशी थेट संवाद साधा

पालकमंत्री राणे : अधिकाऱ्यांनीही संवेदनशीलतेने प्रश्‍न सोडवावेत

सकाळ वृत्तसेवा
ओरोस ता १४ : आपल्या मागण्यांसाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी नागरिकांनी प्रशासनाशी थेट संवाद साधावा. प्रत्येक प्रश्न संवेदनशीलतेने हाताळून नियमांच्या चौकटीत नागरिकांना न्याय देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे पालकमंत्री नीतेश राणे यांनी आज स्पष्ट केले. जिल्ह्यातील उपोषणकर्ते आणि विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी प्रत्येक प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात हा संवाद झाला. जिल्ह्यातील विविध भागांतील एकूण ११० नागरिकांनी आपल्या मागण्या आणि समस्या प्रशासनासमोर मांडल्या होत्या. त्यापैकी ११ प्रकरणांवरील कार्यवाही पूर्ण झाली आहे. उर्वरित प्रलंबित प्रकरणांतील नागरिकांनी पालकमंत्री राणे यांच्यासमोर आपली बाजू मांडली. श्री. राणे यांनी प्रत्येक प्रकरणाची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली. प्रश्न प्रलंबित राहण्याची कारणे, आतापर्यंत झालेली कार्यवाही आणि पुढील उपाययोजना याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेत प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक निर्देश दिले.
यावेळी सहकार, जिल्हा परिषद, महसूल, कृषी, पोलिस, नगरपालिका, पाणीपुरवठा, वीज वितरण, बीएसएनएल टॉवर यांसह विविध विभागांशी संबंधित प्रश्न मांडण्यात आले. काही नागरिकांनी वैयक्तिक स्वरूपाच्या मागण्याही पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. प्रशासकीय कार्यवाही आवश्यक असलेल्या प्रकरणांत नियमांच्या चौकटीत सकारात्मक भूमिका घेऊन शक्य तितक्या लवकर तोडगा काढावा. एखाद्या प्रकरणात कार्यवाही शक्य नसल्यास त्याची कारणेही संबंधित नागरिकांना स्पष्टपणे सांगावीत, अशा सूचना राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकाटे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
---------
प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे
‘‘नागरिकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे. प्रत्येक प्रकरणात संवादातून योग्य मार्ग काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असला पाहिजे. नागरिकांनीही आपल्या मागण्यांसाठी थेट उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी प्रशासनाशी संवाद साधावा. त्यांच्या प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करून न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल,’’ असे राणे यांनी सांगितले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या संवादात नागरिकांना आपले प्रश्न थेट पालकमंत्र्यांसमोर मांडता आले. संबंधित अधिकाऱ्यांना त्याच ठिकाणी कार्यवाहीच्या सूचना देल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com