दरडोई उत्पन्नात सिंधुदुर्ग राज्यात चमकेल

दरडोई उत्पन्नात सिंधुदुर्ग राज्यात चमकेल
Published on

57576

दरडोई उत्पन्नात सिंधुदुर्ग राज्यात चमकेल

पालकमंत्री नीतेश राणे : उद्योग, पर्यटनातून रोजगारनिर्मितीवर भर

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १७ : दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आज सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात सहाव्या क्रमांकावर असून आपला जिल्हा पहिल्या तीन मध्ये आणण्यासाठी खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, नीलेश राणे आणि जिल्ह्याचे प्रशासन असे आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत, अशा शब्दांत पालकमंत्री नीतेश राणे यांनी निर्धार व्यक्त केला.
जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने ज्या ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहेत त्या निश्चितपणे करू आणि हा जिल्हा प्रगतीपथावर नेऊ, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजावंदनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या चहापान कार्यक्रमात राणे पत्रकारांशी बोलत होते. येत्या काही काळात जिल्हा नशामुक्त आणि कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कामाला लागले असून लवकरच आम्ही त्यात यशस्वी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बेरोजगारीच्या प्रश्नावर राणे म्हणाले, जिल्ह्यात म्हणावे तसे औद्योगीकरण झालेले नाही. पर्यटन जिल्हा असूनही त्या दृष्टीनेही खूप मोठं काम करणे आवश्यक आहे. आज इथला तरुण नोकरी धंद्यासाठी आणि रोजगारासाठी गोवा- मुंबई- पुण्याकडे धाव घेतो. मात्र, हे थोपविण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते हे लक्षात घेऊन लवकरच याठिकाणी टूर्स आणि ट्रॅव्हल कंपन्यांच्या प्रतिनिधींची एक परिषद आयोजित करण्यात येणार आहे. जेणेकरून या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतील. त्यामुळे रोजगार निर्मिती होऊन व्यवसायही वाढतील. कणकवली येथे होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलाचा उल्लेख करून राणे म्हणाले, या ठिकाणी गाळा घेण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. बाजार समितीच्या संकुलाचे काम पूर्ण होताच या ठिकाणी मोठी उलाढाल होईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारही उपलब्ध होतील.
------
चिपी ते नवी मुंबई लवकरच विमानसेवा!
राणे म्हणाले, येत्या गणेशोत्सवापूर्वी चिपी ते नवी मुंबई अशी विमानसेवा सुरू करू. त्यासाठी ‘फ्लाय ९१’ व ‘इंडिगो’ या कंपन्यांनी तयारी दाखवली आहे. जिल्ह्यात येणारे उद्योग हे पर्यावरण पूरक असावे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. मात्र, काही पर्यावरणवादी संस्था, कार्यकर्ते काही उद्योगांना, प्रकल्पांना विरोध करीत आहेत. मात्र, विरोध करताना राजकीय भूमिका न घेता स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. विरोधासाठी विरोध करणारे आज घरी बसले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com