

‘कान्हेरे स्मारका’ला भव्य स्वरूप देणार
योगेश कदम ः आवश्यक निधीसाठी पाठपुरावा करणार
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १७ : ‘हुतात्मा अनंत कान्हेरे यांचे बलिदान आणि शौर्याची प्रेरणा तरुण पिढीला मिळावी, यासाठी खेड शहरातील त्यांच्या स्मारकाला लवकरच नवे स्वरूप देण्यात येणार आहे,’ अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली.
खेड शहरातील तीनबत्ती नाका येथील हुतात्मा अनंत कान्हेरे चौकातील त्यांच्या पुतळ्याला गृहराज्यमंत्री श्री. कदम यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. ब्रिटिश राजवटीविरोधात अवघ्या १८ व्या वर्षी देशासाठी बलिदान देणारे खेडचे सुपुत्र हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अभिवादन केले. २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी ए. एम. टी. जॅक्सन यांच्यावर अनंत कान्हेरे यांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. १९ एप्रिल १९१० रोजी ठाणे कारागृहात त्यांना फाशी देण्यात आली. हुतात्मा कान्हेरे यांच्या मूळ गावी आयनी येथे यापूर्वी स्मारक व सुशोभीकरणासाठी २५ लाख रुपयांचा निधी आणण्यात आला असून, या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच खेड शहरातील स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी आवश्यक बाबींचा समावेश असलेला डीपीआर तयार करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे मंत्री कदम यांनी सांगितले. हुतात्मा अनंत कान्हेरे यांची देशभक्ती, शौर्य आणि बलिदानाची आठवण पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी स्मारकाला भव्य स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.