‘सुंदरवाडी’ हरवली खड्ड्यात

‘सुंदरवाडी’ हरवली खड्ड्यात
Published on

57754
57756
--
57821 - पॉईंटर


‘सुंदरवाडी’ हरवली खड्ड्यात

सावंतवाडीकर हतबल; वाहतूक सोडाच, रस्त्यावरून चालणेही मुश्किल

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ : ‘सुंदरवाडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी शहरातील रस्त्यांची पाईपलाईन खोदाईनंतर अक्षरशः चाळण झाली असून, शहरातील बहुतांश रस्ते खड्ड्यांत हरवले आहेत. वाहतुकीला सोडाच; मात्र रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांसाठीही ही रस्त्यांची दुरवस्था डोकेदुखी ठरत आहे. सह पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून शहराच्या सौंदर्यालाही गालबोट लागले आहे. पावसाळ्यात खड्डे बुजवण्याची अडचण असली तरी अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या खड्ड्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असताना पालिका प्रशासनाच्या संथ कारभाराबद्दल नागरिकांत तीव्र नाराजी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक वाढणार असल्याने खड्ड्यांचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

शहरात गॅस पाईपलाईन, तसेच नव्या नळपाणी योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच्या पाईपलाईनसाठी शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदाई झाली; मात्र खोदलेले रस्ते पुन्हा योग्य प्रकारे बुजवणे गरजेचे होते, त्याकडे संबंधित ठेकेदाराने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. खड्डे बुजवताना नियमावलीचे पालन झाले नाही. खुद्द उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या कामाची पोलखोल करत नियमांवर बोट ठेवले होते. खोदलेले रस्ते पाईपलाईन टाकल्यानंतर बुजवताना डांबरीकरणासाठी हॉटमिक्सऐवजी कोल्डमिक्सचा वापर केला, तसेच बऱ्याच तांत्रिक गोष्टी पाळल्या नसल्याचे सांगितले होते. याचाच परिणाम आता पावसाळ्याच्या मध्यावर शहरात दिसू लागला आहे. बुजवलेले रस्ते पुन्हा खचून त्याठिकाणी भलेमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर गाडी चालवणे मुश्किल बनले आहे. खड्डे पावसाळ्यात बुजवणे कठीण असल्याने प्रशासनाला गप्प बसण्याव्यतिरिक्त दुसरा उपायच नाही. मात्र, छोटे-मोठे खड्डे सोडा, अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या खड्ड्यांकडे तरी निदान प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी उमटत आहे. दुसरीकडे मुख्य बाजारपेठेतील रस्त्याची खोदाई म्हणावी तितकी झाली नसताना, सुस्थितीत असलेल्या रस्त्यावरही जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालक पूर्ण वैतागले आहेत.
​शहरात दिवसभरात छोटे-मोठे अपघात या खड्ड्यांमुळे घडत आहेत, तर दुसरीकडे रस्त्यावरून साधे चालणेही मुश्किल झाले असून खड्ड्यांमुळे पादचाऱ्यांच्या अंगावर चिखलाचे पाणी उडत आहे. इंदिरा गांधी व्यापारी संकुलाच्या समोरील रस्त्याची तर चाळण झाल्याने रस्त्याच्या बाजूला बसणाऱ्या व्यापाऱ्यांच्या भाजीपाल्यावर तसेच त्यांच्या अंगावर हे चिखलाचे पाणी उडत असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकूणच शहरातील ही परिस्थिती अत्यंत दयनीय असून या परिस्थितीबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
----
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर
​अवघ्या काही दिवसांवर गणेशचतुर्थीसारखा मोठा सण येत आहे. यासाठी बाजारपेठेमध्ये मोठी वाहतूक पाहायला मिळणार आहे, मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होणार आहेत; त्यामुळे गाड्यांची संख्याही वाढणार आहे. मात्र, खड्ड्यांची ही स्थिती लक्षात घेता मोठी अडचण पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या खड्ड्यांबाबत योग्य उपाययोजना आखणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून ठेकेदाराच्या कामाबाबत दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप अनेकांकडून केला जात आहे; मात्र सत्ताधारी याकडे मात्र जातीने लक्ष देताना दिसून येत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
---------
​जांभा दगडाचा प्रयोग कुचकामी
​शहरात नळपाणी आणि गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्यांच्या ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. हे खड्डे वाहतुकीला डोकेदुखी ठरल्यानंतर आणि नागरिकांचा रोष उद्भवल्यानंतर पालिका प्रशासनाकडून हे खड्डे जांभा दगडाने भरण्याचे काम हाती घेतले. मात्र, भरलेले खड्डे पुन्हा उखडले जात आहेत. प्रशासनाचा हा प्रयोग पूर्णतः अपयशी ठरला असून खड्ड्यांचा प्रश्न प्रशासनासह सत्ताधाऱ्यांना सोडवणे कठीण बनल्याची टीका होत आहे.
----------
​कोट
शहरातील खड्डे बुजवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पावसाळा असल्याने काँक्रीटने किंवा डांबराने खड्डे बुजवणे कठीण असल्याने जांभा दगडाचा प्रयोग केला आहे. गणेशचतुर्थी सण लक्षात घेता हे खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करून चांगल्या प्रतीच्या पावसाळी डांबराने हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न राहणार आहे.
​- श्रद्धा सावंत भोसले, नगराध्यक्षा
--------
‘सुंदरवाडी’ची ओळख धोक्यात
- पाईपलाईन खोदाईचा मोठा परिणाम
- रस्ते बुजवताना नियमांकडे दुर्लक्ष
- पावसाळ्यात रस्ते पुन्हा खचले
- खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त
- चिखलाचे पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर
- इंदिरा गांधी व्यापारी संकुलासमोर दुरवस्था
- जांभा दगडाचा प्रयोग अपयशी
- गणेशचतुर्थीपूर्वी आव्हान
- पावसाळी डांबराचा पर्याय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com