

57766
लोकशाहीच्या पायाभरणीत आंबेडकरांचे योगदान
संग्राम कासले : कुणकवळेत वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे चौथे पुष्प
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ : भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाही भारताची घटनात्मक रचना करण्यात निर्णायक योगदान दिले. त्यामुळे स्वतंत्र भारताच्या लोकशाहीची पायाभरणी करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे प्रतिपादन ‘बार्टी’चे समतादूत आणि भारतीय बौद्ध महासभा प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष संग्राम कासले यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण, महिला शाखा आणि संस्कार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिका २०२६ चे चौथे पुष्प कुणकवळे गाव शाखेत गुंफण्यात आले. या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष रविकांत कदम, तालुका सरचिटणीस नचिकेत पवार, शंकर कदम, योगेश वराडकर, मिलिंद पवार, सचिन कासले, संदीप कदम, सानिका कदम, चंद्रकांत कदम, निशा कदम, सायली कदम, संघमित्रा कदम, गौतम कदम, हेमंत कदम आदी उपस्थित होते. सचिन कासले यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद पवार यांनी आभार मानले.
----
वंचित समाजाला अधिकार
श्री.कासले म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते केवळ ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळणे पुरेसे नव्हते, तर अस्पृश्यता, जातिभेद आणि सामाजिक विषमता नष्ट होऊन सर्व भारतीयांना समान अधिकार मिळणे आवश्यक होते. त्यांनी शोषित आणि वंचित समाजाला शिक्षण, प्रतिनिधित्व, रोजगार आणि राजकीय अधिकार मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष केला. बाबासाहेबांनी ब्रिटिशांच्या आर्थिक व प्रशासकीय धोरणांवर टीका करत भारतीयांच्या हितासाठी शासनव्यवस्थेत मूलभूत सुधारणांची मागणी केली. तसेच सामाजिक व राजकीय परिवर्तनासाठी कायदा, संविधान आणि लोकशाही संस्थांचा मार्ग स्वीकारला.’’