पत्रादेवीत स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाला नवा उजाळा

पत्रादेवीत स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाला नवा उजाळा
Published on

५७७९१

पत्रादेवीत स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाला नवा उजाळा

हुतात्मा स्मारकाचे २५ ला संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १७ : गोवा स्वातंत्र्य संग्रामात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विशेषतः बांदा परिसरातील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. पत्रादेवी-बांदा सीमाभाग हा गोवा मुक्ती लढ्याचा महत्त्वाचा साक्षीदार ठरला असून, या संघर्षातील हुतात्म्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी पुनर्बांधणी व सुशोभीकरण केलेल्या पत्रादेवी येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारकाचे उद्‍घाटन २५ ऑगस्ट रोजी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजनाथ सिंह उपस्थित राहणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
या उद्‍घाटनामुळे गोवा मुक्ती संग्रामात योगदान देणाऱ्या बांदावासीयांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर मानवंदना मिळणार आहे. गोवा मुक्ती लढ्याच्या इतिहासात बांदा परिसरातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी पत्रादेवी सीमाभागातून सत्याग्रह, आंदोलन आणि विविध मुक्ती चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे पत्रादेवी हुतात्मा स्मारकाचे उद्‍घाटन हा केवळ गोव्याचाच नव्हे, तर सिंधुदुर्ग आणि बांदा परिसरासाठीही ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.
गोव्याच्या प्रवेशद्वारावर उभे असलेले पत्रादेवी हुतात्मा स्मारक महाराष्ट्रातून गोव्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते. गोव्याच्या मुक्तीसाठी प्राणांची पर्वा न करता लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची साक्ष हे स्मारक आजही देत आहे. पेडणे तालुका आणि बांदा सीमाभागाचा गोवा मुक्ती संग्रामाशी असलेला ऐतिहासिक संबंध लक्षात घेता या स्मारकाचे जतन आणि संवर्धन महत्त्वाचे मानले जाते.
पत्रादेवी हुतात्मा स्मारकाच्या पुनर्बांधणी व सुशोभीकरणाच्या कामाचा प्रारंभ गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते झाला होता. त्यानंतर काही काळ हे काम रखडले; मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या पुढाकारामुळे प्रकल्पाला गती मिळाली आणि आता स्मारक नव्या स्वरूपात उभे राहिले आहे. गोवा मुक्ती लढ्याच्या काळात महाराष्ट्रातून पत्रादेवीमार्गे गोव्यात प्रवेश करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना बांदा व परिसरातील नागरिकांनी विविध प्रकारे मदत केल्याची नोंद इतिहासात आहे. अनेक कार्यकर्त्यांनी सीमा ओलांडून चळवळीत सहभाग घेतला, तर अनेकांनी संघटनात्मक कार्यातून मुक्ती आंदोलनाला बळ दिले. त्यामुळे पत्रादेवी हुतात्मा स्मारक हे सिंधुदुर्ग आणि गोवा या दोन्ही प्रदेशांच्या संयुक्त स्वातंत्र्य वारशाचे प्रतीक मानले जाते.
---------
वंदे मातरम् प्रदर्शनाला भेटीचे आवाहन
दरम्यान, गोव्यातील आझाद मैदानावर ‘वंदे मातरम्’च्या इतिहासावर आधारित विशेष प्रदर्शन मांडण्यात आले आहे. स्वातंत्र्य चळवळीतील विविध टप्पे, ऐतिहासिक दस्तऐवज आणि दुर्मीळ छायाचित्रांचा या प्रदर्शनात समावेश असून, सीमाभागातील नागरिकांनीही हे प्रदर्शन आवर्जून पाहावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.
-------
पेडणेच्या स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव
गोवा मुक्ती संग्रामात पेडणे तालुक्यातील तुळशीदास हिरवे, मनोहर पेडणेकर, बापू गावस, बाबल नाईक, बाबाजी पालोस्कर, बाळा केणी, राधाकृष्ण खलब, हरिश्चंद्र साळगावकर, मधुकर बांदोडकर यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी योगदान दिले. सीताराम साळगावकर, नानू सरमळकर, सखाराम नाईक, हरी शेटे वझरकर आणि कृष्णा केरकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनीही मुक्ती चळवळीत मोलाची भूमिका बजावली.
---------
कोट
२५ ऑगस्ट रोजी होणारे पत्रादेवी हुतात्मा स्मारकाचे उद्‍घाटन हे गोवा मुक्तीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतींना नव्याने उजाळा देणारा आणि बांदा-सिंधुदुर्गच्या स्वातंत्र्य वारशाला राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करणारा महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. पत्रादेवी हुतात्मा स्मारकाचे नवे रूप पाहता १९ डिसेंबरचा गोवा मुक्ती दिनाचा शासकीय कार्यक्रमही येथेच व्हावा.
- सूर्यकांत तोरस्कर, माजी सरपंच, तोरसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com