राजापूर-हातिवलेतील टोलमाफीवरून वातावरण तापले

राजापूर-हातिवलेतील टोलमाफीवरून वातावरण तापले
Published on

rat18p12.jpg-
58003
राजापूर ः मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले येथील टोलनाका.
---------------------------
हातिवलेतील टोलवरून वातावरण तापले
स्थानिकांची टोलमाफीची मागणी ; नाका सुरू करण्यासाठी हालचाली
राजापूर, ता. १८ ः पाच वर्षापूर्वी झालेल्या आंदोलनानंतर ठप्प झालेला मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील हातिवले येथील टोलनाका कार्यान्वित होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढील महिनाअखेरीला हा टोलनाका सुरू होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील स्थानिक नागरीकांसह वाहतूकदारांना या टोलनाक्यावर संपूर्ण टोलमाफी देण्यात यावी, अशी सातत्याने मागणी केली जात असताना त्याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. स्थानिक वाहनांना टोलमाफी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांनी दिला आहे. त्यामुळे टोलमाफीवरून वातावरण तापू लागले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील हातिवले येथे टोलनाका उभारला आहे. या टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावी, अशी सातत्याने मागणी केली जात आहे. त्यावरून पाच वर्षापूर्वी स्थानिकांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन छेडले होते. तेव्हापासून हातिवले येथील टोलनाका सुरू झालेला नाही वा स्थानिकांच्या टोलमाफीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील महामार्गावरील टोलनाका कालपासून सुरू झाला. पुढील महिनाअखेरीला तालुक्यातील हातिवले येथील टोलनाका सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून सातत्याने धगधगत असलेल्या स्थानिक वाहनांना संपूर्ण टोलमाफीच्या मागणीने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. हातिवले येथील टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी देण्यात यावी, अशी सातत्याने स्थानिकांकडून मागणी केली जात आहे. याचे निवदेनही यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाला स्थानिक वाहनचालक, ग्रामस्थांकडून दिली आहे. चार महिन्यांपूर्वी राजापूर पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीमध्येही राजापूर तालुक्यातील स्थानिक नागरिकांसह वाहतूकदारांना या टोलनाक्यावर संपूर्ण टोलमाफी देण्यात यावी, अशा मागणीचा ठरावही सर्वानुमते मंजूरही केला आहे. असे असताना स्थानिकांना टोलमाफी देण्याच्या मागणीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना टोलनाका सुरू होण्याच्या सुरू झालेल्या हालचालींमुळे पुन्हा एकदा टोलमाफीच्या मुद्द्याने उचल खाल्ली आहे.

चौकट
टोलमाफीबाबत स्थानिकांची मागणी
राजापूर शहरामध्ये प्रमुख शासकीय कार्यालयांसह राजकीय पक्षांचे कार्यालये, दवाखाने, शाळा, महाविद्यालय, बँका, पोस्ट कार्यालय, बाजारपेठ आहेत. त्यामुळे राजापूर शहरामध्ये लोकांची विविध कामानिमित्ताने दैनंदिन रहदारी असते. काहीवेळा दिवसातून चार-पाच वेळाही फेऱ्या माराव्या लागतात. या साऱ्या लोकांना टोलनाक्यावरून जा-ये करावी लागते. त्यामुळे सातत्याने टोल फी भरणे वाहनचालकांना आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे नाही. त्यामुळे तालुक्यातील स्थानिक नागरिकांना संपूर्ण टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी राजापूरवासियांकडून सातत्याने केली जात आहे.

कोट
मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले येथे उभारलेल्या टोलनाक्यावरून सातत्याने स्थानिक ग्रामस्थांच्या वाहनांची वर्दळ राहणार आहे. त्यामुळे सातत्याने टोल फी भरणे वाहनचालकांना आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे नसल्याने राजापूर तालुक्यातील स्थानिक नागरिकांसह वाहतूकदारांना या टोलनाक्यावर संपूर्ण टोलमाफी देण्यात यावी अन्यथा, त्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- अरविंद लांजेकर, माजी उपसरपंच, कोंढेतड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com