लांज्यात मोकाट गुरे पकडण्याची मोहीम

लांज्यात मोकाट गुरे पकडण्याची मोहीम
Published on

लांज्यात मोकाट गुरे पकडण्याची मोहीम
दंड भरून सोडवता येतील अन्यथा गोशाळेत पाठवणार
लांजा, ता. १८ः येथील नगरपंचायत हद्दीत मोकाट गुरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्येला आळा घालण्यासाठी नगरपंचायतीने कडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणारी गुरे पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे.
लांजा शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट गुरांचा आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. याबाबत नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत चर्चाही केली होती. मोकाट जनावरे पकडून नगरपंचायतीच्या सुरक्षित जागेत ठेवल्यानंतरही मालक पुढे आले नाहीत तर अशा जनावरांना गोशाळेत पाठवण्याचा निर्णय सभेत घेतला होता. त्यानुसार प्रशासनाने या अगोदर २५ गुरे पडकून गोशाळेत पाठवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मोहीम सुरू कररण्यात आली आहे. नगरपंचायतीने पकडण्यात आलेली गुरे संबंधित मालकांना तीन दिवसांच्या आत दंड भरून सोडवून घेता येणार आहेत; मात्र, निर्धारित मुदतीत गुरे सोडवून न घेतल्यास ती गुरे गोशाळेत वर्ग करण्यात येणार आहेत.

चौकट
गोशाळेतील गुरांबाबत नगरपंचायतीकडे तक्रार नको
गुरे गोशाळेत वर्ग केल्यानंतर ती सोडवून देण्याबाबत कोणतीही तक्रार अथवा विनंती नगरपंचायतीकडे करता येणार नसल्याचे नगरपंचायतीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गुरे रस्त्यावर मोकाट न सोडता संबंधित गुरेमालकांनी आपल्या जनावरांची जबाबदारी घेण्याचे आवाहन नगरपंचायतीकडून करण्यात आले आहे. मोकाट गुरे पकडल्यानंतर ती सोडवून नेल्यानंतर तीच गुरे पुन्हा दिसून आल्यास संबंधित गुरे मालकांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

Marathi News Esakal
www.esakal.com