

देवरूख टपाल कार्यालयाला जागा द्या
क्रांती व्यापारी संघटना; तळमजल्याचा पर्याय
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. १९ ः देवरूख शहरातील मुख्य टपाल कार्यालय सध्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कार्यरत आहे; मात्र, तेथील अरुंद जिना आणि उंच पायऱ्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, दिव्यांग आणि आजारी व्यक्तींची मोठी गैरसोय होत आहे. या समस्येकडे लक्ष वेधत ‘क्रांती व्यापारी संघटने’ने कार्यालयासाठी तळमजल्यावर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली आहे.
या संदर्भात संघटनेने रत्नागिरी विभागाच्या टपाल अधीक्षकांकडे सातत्याने पाठपुरावा केला. टपाल विभागाने शासकीय आस्थापनांमध्ये सुमारे १५०० चौरस फूट जागा शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र तिथे पुरेशी जागा उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे आता केवळ शासकीय जागेचा आग्रह न धरता खासगी जागांचा पर्याय तपासावा, अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे. शासकीय जागा उपलब्ध होत नसल्याने शहरातील खासगी किंवा व्यावसायिक इमारतींमध्ये १५०० चौ. फूट जागा भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या काही संभाव्य खासगी जागांचे पर्याय संघटनेने सुचवले असून, टपाल विभागाने त्यांची तत्काळ पाहणी करावी तसेच देवरूख हे तालुक्याचे मुख्य केंद्र असल्याने नागरिकांना सहज प्रवेश करता येईल, अशी प्रशस्त, सुरक्षित आणि तळमजल्यावरील जागा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी केली आहे. शासकीय जागा मिळत नाही म्हणून नागरिकांची गैरसोय कायम ठेवणे अयोग्य आहे. त्यामुळे डाक विभागाने त्वरित पावले उचलून ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना सुलभ सेवा मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या पाठपुराव्यात संघटनेचे निखिल कोळवणकर, इस्तियाक कापडी, नितीन हेगशेट्ये, अण्णा बेर्डे, भैया जागुष्टे, संदीप वेल्हाळ, आकाश भोपळे, साई कामेरकर, बावा भुवड यांच्यासह कृष्ण भोसले सक्रिय योगदान देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.