

58903
मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या
वाढीव खर्चास जबाबदार कोण?
तज्ज्ञ डॉक्टर कसे उपलब्ध होणार?
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ : ‘‘बहुचर्चित मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीस झालेल्या विलंबामुळे वाढणाऱ्या प्रचंड आर्थिक बोजाला नेमके जबाबदार कोण,’’ असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी आज उपस्थित केला. योग्य आरोग्य सुविधा आणि रुग्णालयाअभावी रुग्णांचे प्राण जात असताना, रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असल्याच्या आविर्भावात आनंदोत्सव साजरा करणे, हे अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली.
येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. परुळेकर म्हणाले, ‘‘शिंदे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू होऊन त्यात पहिली शस्त्रक्रिया पार पडल्यासारखे वातावरण निर्माण करत आहेत. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये आमदार दीपक केसरकर यांनी याच रुग्णालयाचे नाव सांगून मते मिळवली; मात्र, हे रुग्णालय नेमके सावंतवाडी शहरासाठी आहे की संपूर्ण जिल्ह्यासाठी, तसेच ते मुंबई-गोवा महामार्गावर हवे की शहरात, असा प्रश्न आहे. रुग्णालयाचा खर्च ३८ कोटींवरून थेट ८० कोटी रुपयांवर पोहोचणार आहे, असे केसरकर म्हणत असून या वाढीव खर्चाला जबाबदार कोण?’’
‘‘जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे साडेआठ लाख आहे. जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सेवा मिळणे, ही चांगली बाब असली, तरी सध्या अस्तित्वात असलेल्या रुग्णालयांचेच सुसज्ज सक्षमीकरण करून तेथे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून दिल्यास रुग्णांना मोठा फायदा होईल,’’ असे डॉ. परुळेकर यांनी स्पष्ट केले.
----
‘नागरिकांना खोटी माहिती देणे थांबवा!’
डॉ. परुळेकर म्हणाले, ‘‘दरवर्षी सुमारे १० हजार लोक उपचारासाठी गोव्यात जातात, असे आमदार केसरकर म्हणत आहेत; म्हणजेच रोज १० ते १२ रुग्ण गोव्याकडे रवाना होतात. उपजिल्हा रुग्णालयात मंजूर १९ पदांपैकी केवळ ३ डॉक्टर कार्यरत आहेत, तर उर्वरित पदे रिक्त आहेत. अशा स्थितीत मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासाठी लागणारे तज्ज्ञ डॉक्टर कसे उपलब्ध होणार? विधिमंडळात कायदा झाल्याशिवाय असे तज्ज्ञ डॉक्टर मिळणे कठीण आहे, त्यामुळे नागरिकांना खोटी माहिती देणे थांबवावे. आमदार केसरकर आणि पालकमंत्री नीतेश राणे यांनी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्धतेबाबत माहिती द्यावी.’’