कोकणावर अन्याय करणारे प्रकल्प लादू नका

कोकणावर अन्याय करणारे प्रकल्प लादू नका
Published on

कोकणात घातक प्रकल्प नकोत
ॲड. असिम सरोदे ः पर्यावरण रक्षणासाठी अन्यायाविरूद्ध आवाज उठवा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : ‘कोकणातील पर्यावरणावर सातत्याने अन्याय होत असून, त्याची अवस्था पीडित व्यक्तीसारखी झाली आहे. विकासाला विरोध करण्याचा प्रश्न नाही; मात्र जगाने बंदी घातलेले किंवा पर्यावरणाला घातक ठरणारे प्रकल्प कोकणावर लादण्याचा प्रयत्न होत असेल तर तो अन्याय येथील जनतेने सहन न करता त्या विरोधात आवाज उठवावा,’ असे आवाहन ॲड. असिम सरोदे सरोदे यांनी केले.
शहरालगतच्या जे. के. फाईल्स येथील रॉयल हॉलमध्ये लॉ लॅब संघटनेतर्फे ‘न्याय स्वराज्य सभा : संविधान, न्याय व लोकशाहीचा संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ॲड. सरोदे बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गवाणकर, जिल्हा परिषद माजी सदस्य उदय बने, ॲड. स्वप्नील खोपकर, ॲड. रोहन पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी ॲड. सरोदे म्हणाले, देशात कायद्याचे राज्य प्रस्थापित होणे ही काळाची गरज आहे. ‘माझ्यासारखेच प्रत्येकाचे मत असावे’ ही भावना चुकीची असून, लोकशाहीसाठीही धोकादायक आहे. आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक असतात. त्यांना समजून घेण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे. कायद्यापुढे सर्व समान असतात. जातिभेदाचे काटे दूर करण्याची गरज आहे. मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाते; मात्र एकदा त्यांच्या जीवनातील वेदना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव होईल, असेही त्यांनी सांगितले.
---
मतदानाचा अधिकार योग्य पद्धतीने वापरा
ईव्हीएमबाबत बोलताना ते म्हणाले, ‘नागरिकांनी आपल्या हातात असलेल्या मतदानाच्या अधिकाराचा योग्य वापर केला पाहिजे. आपल्या हातात संविधान आहे आणि हीच आपली मोठी ताकद आहे. स्वतःवर राज्य करण्यास आपण शिकले पाहिजे. इतरांच्या विचारांच्या आहारी जाऊन त्याप्रमाणे वागण्याऐवजी स्वतःच्या विवेकाने निर्णय घेण्याची गरज आहे. प्रत्येकाने स्वतःवर राज्य करायला शिकले तर देशात स्वराज्य प्रस्थापित होऊ शकते.
---
ज्यांना काढले त्यांच्या ताब्यात पक्ष
शिवसेनेतील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना ॲड. सरोदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतही वक्तव्य केले. उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले होते. या ठरावावर तिघा आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ज्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले त्यांनाच निवडणूक आयोगाने पक्ष ताब्यात दिला, असेही सरोदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com