

59333
भारताची अर्थव्यवस्था वेगवान वाटेवर
सतीश मराठे ः डिजिटल पेमेंटपासून सेवा क्षेत्रापर्यंत देशाची दमदार प्रगती
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २४ : जगात भारत आज सर्वांत वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. युक्रेन-रशिया युद्धासारख्या जागतिक संकटांचा परिणाम होऊनही भारताकडे गरजेपेक्षा तिप्पट अन्नसाठा आहे. सेवा क्षेत्र म्हटले की केवळ सॉफ्टवेअरचा विचार होतो; मात्र प्रत्यक्षात ३० ते ३५ प्रकारच्या सेवा क्षेत्रांत भारताने मोठी प्रगती केली आहे. मोबाईलद्वारे होणाऱ्या डिजिटल पेमेंटची भारतातील व्यवस्था युरोपमध्येही अशा स्वरूपात दिसत नाही. सर्वसमावेशक विकासाचे मॉडेल स्वीकारल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होत आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, गतिमान आणि स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने सहकार भारती सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन, ओरोस येथे आयोजित ''ग्रामीण सहकार संवाद'' या विशेष चर्चासत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी होते. बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महाराष्ट्र राज्य काजू महामंडळाचे संचालक तथा सहकार भारतीचे कोकण विभाग प्रमुख धनंजय यादव, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, सहकार भारती सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष अमित आवटे आदी उपस्थित होते. श्री. म्हणाले, गेल्या काही वर्षांत देशात सुमारे ५५ कोटी नवीन बँक खाती उघडण्यात आली. या छोट्या खात्यांमध्येही हजारो कोटी रुपयांची उलाढाल सुरू झाली आहे. आयुष्मान भारत, अटल पेन्शन योजना आणि विविध विमा योजनांमुळे सर्वसामान्य माणूस आर्थिक प्रवाहात आला आहे. आता ग्रामीण भागाच्या विकासाला अधिक वेग देण्यासाठी प्राथमिक कृषी पतसंस्था आणि अन्य सहकारी संस्था सक्षम करणे तसेच गरजेनुसार नवीन संस्था निर्माण करणे आवश्यक आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, मच्छीमार, काजू उत्पादक आणि युवा उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------
उपाययोजनांवर चर्चा
यावेळी जिल्ह्यातील सहकारी संस्थांसमोरील सद्यस्थितीतील समस्या, नव्या संधी, संस्थांच्या सक्षमीकरणाच्या दिशा, बदलत्या आर्थिक परिस्थितीतील आव्हाने आणि सहकारातून ग्रामीण विकासाला मिळू शकणारी नवी गती याबाबत चर्चासत्रात सखोल विचारमंथन झाले. शेती, मत्स्यव्यवसाय, काजू, दुग्धव्यवसाय, पर्यटन, ग्रामीण उद्योग आणि विविध सहकारी संस्थांना भविष्यात अधिक सक्षमपणे वाटचाल करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.