मुलांना तणावमुक्त करण्यासाठी ‘मनमित्र’

मुलांना तणावमुक्त करण्यासाठी ‘मनमित्र’
Published on

59410

मुलांना तणावमुक्त करण्यासाठी ‘मनमित्र’

जिल्ह्यात उपक्रम; वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ : मुलांमधील ताण तणाव प्रचंड वेगाने वाढत आहे. यातूनच शाळकरी मुलांच्या आत्महत्येच्या घटना वाढीला लागल्या आहेत. संवेदनशील मुलांना तणावातून बाहेर काढणे गरजेचे आहे. यासाठी मालवण येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगणतर्फे मनमित्र उपक्रम राबविण्यात येत आहे.
याबाबत प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे, सावंतवाडी येथे दोन दिवसांपूर्वी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणच्या मोती तलावात एका मुलीने आत्महत्या केली, तर तिला वाचवण्यासाठी गेलेल्याचाही या घटनेत करुण अंत झाला. जिल्ह्यात अलीकडे आणखीही काही अशा घटना घडल्या आहेत. अशा घटना समाजात वारंवार घडत असून मुलांमधील ताणतणाव आणि आत्महत्येचे हे लोण वेगाने पसरत असल्याचे समोर येत आहे. या गंभीर वेळीच मात करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी ‘बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण’ आणि सिंधुदुर्गातील कृतीशील समाजसेवी मनोविकास तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मनमित्र’ हा जीवन कौशल्य विकास उपक्रम राबवण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत माड्याची वाडी, पाट, परुळे, केळुस, माजगाव आणि मळगाव या सहा शाळांमधील नववीच्या विद्यार्थ्यांसाठी दर आठवड्याला एक याप्रमाणे एकूण सहा व्याख्याने आयोजित केली होती. ताणतणावाचे योग्य नियोजन करणे, स्वतःच्या क्षमता आणि मर्यादांची जाणीव करून देणे, यासारख्या आवश्यक जीवन कौशल्यांचा समावेश यात होता. विद्यार्थ्यांबरोबरच पाट, परुळे, माड्याची वाडी व केळुस येथील ६० शिक्षक व संस्थाचालकांसाठी एक दिवसाचे सेमिनार आयोजित करण्यात आले. यात पाट हायस्कूलमधील घटनेचा संदर्भ घेत शिक्षक व संस्थाचालकांशी सखोल संवाद साधला. भविष्यात तणावग्रस्त मुलांना वेळीच ओळखून त्यांच्याशी संवाद साधता यावा, यासाठी शिक्षकांमधूनच ‘प्रशिक्षित कौन्सिलर’ तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे. विशेष म्हणजे, डॉ. पाटकर हे कोणतेही मानधन न घेता सामाजिक बांधिलकी म्हणून ‘मनमित्र’ हा उपक्रम राबवत आहेत, तर बॅरिस्टर नाथ पै सेवांगण या उपक्रमाचा सर्व आर्थिक भार व इतर सहाय्य करत आहे.
-----------
सहभागाचे आवाहन
मुलांमधील वाढती आक्रमकता आणि तणाव रोखण्यासाठी शिक्षक, पालक, मित्र आणि शेजाऱ्यांनी संवेदनशील राहणे गरजेचे आहे. सावंतवाडी व परिसरातील ज्या शाळा, संस्था, पालक किंवा शिक्षकांना आपल्या शाळेत हा उपक्रम सुरू करायचा आहे, त्यांनी त्वरित ॲड. संदीप निंबाळकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सस्थेतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com