

मळगाव वाचनालयात
उद्या श्रद्धांजली सभा
सावंतवाडी ः वैद्यकीय क्षेत्रातील ‘देवमाणूस’ डॉ. अरविंद दत्तात्रय खानोलकर यांचे निधन झाले. या निमित्त (कै.) उदय खानोलकर वाचनालय, मळगावतर्फे बुधवारी (ता. २६) सायंकाळी ४.३० वाजता वाचनालयाच्या रमाकांत खानोलकर सभागृहात श्रद्धांजली सभेचे आयोजन केले आहे. ‘सेवा करा, पण तिचा गाजावाजा करू नका’ या त्यांच्या शिकवणुकीला उजाळा देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाने केले आहे. सहा दशकांपर्यंत अविरत रुग्णसेवा करणारे, निधनाच्या तीन दिवस आधीपर्यंत रुग्णांची सेवा करणारे, गरजू, हरिजन- गिरिजन बांधवांना मोफत उपचार देणारे, सेवाभावी, संवेदनशील आणि दातृत्वशील व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. खानोलकर. त्यांचे जाणे म्हणजे केवळ एका डॉक्टरचे जाणे नाही, तर माणुसकीला धर्म मानणारा एक आधारस्तंभ हरपला आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा, सेवाभावाचा वारसा पुढे नेण्यासाठी श्रद्धाजली सभेचे आयोजन केले आहे.
--
वेशभूषा स्पर्धेला
उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण ः भारत देश पुन्हा एकदा सुजलाम, सुफलाम बनवायचा असेल क्रांतिकारकांनी आचरणात आणलेले गुण आचरणात आणावेत, असे प्रतिपादन श्री शिवराज मंच अध्यक्ष आणि शिवशंभो विचार मंच कोकण प्रांतचे सहसंयोजक भूषण साटम यांनी केले. कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे ''भारतीय स्वातंत्र्यात क्रांतिकारकांचे योगदान'' या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनील नाईक, कट्टा केंद्रप्रमुख गौरव नाईक, मुख्याध्यापिका देवयानी गावडे, पालक-शिक्षक संघ सदस्य गणेश वाईरकर, समाजशास्त्र विभाग प्रमुख एकनाथ राऊळ, प्रशालेचे सहायक शिक्षक किसन हडलगेकर आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा झाली.
.........................
सावंतवाडीत रविवारी
‘बुद्धिबळा’चे धडे
सावंतवाडी ः जिल्ह्यातील अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय रेटेड बुद्धिबळ खेळाडू आणि राज्य पंच बाळकृष्ण पेडणेकर याचे विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ खेळाचे विशेष मार्गदर्शन शिबिर रविवारी (ता. ३०) सकाळी ९.३० वाजता येथील पाटणकर वाड्यातील मुक्ताई अकॅडमीच्या प्रशिक्षण केंद्रात आयोजित केले आहे. पुढील कालावधीत होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेसाठी मार्गदर्शन करण्यात येईल. शिबिरात ओपनिंग, मिडलगेम, एण्डगेम, टॅक्टिकल गेम, स्पर्धेचे नियम आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल. इच्छुक विद्यार्थ्यांनी नावे द्यावीत, असे आवाहन अकॅडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी केले आहे.
....................
पाट येथे आज
धार्मिक कार्यक्रम
कुडाळ ः श्रावण मंगळवार निमित्त उद्या (ता. २५) रिक्षा चालक-मालक संघटना पाट यांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ग्रामस्थांची भजने, रात्री ८.३० वाजता हेरंब पारंपरिक दशावतार लोककला नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचा ‘हेरंब जननी महामाया’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---
पंचद्रवीड पतपेढीची
वेंगुर्लेत उद्या सभा
कणकवली ः पंचद्रवीड ब्राह्मण सहकारी पतपेढीची ९३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (ता. २६) सकाळी १०.३० वाजता साई डिलक्स वेंगुर्ले येथे आयोजित केली आहे. सभेस जिल्ह्यातील सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती बखले यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.