ग्रंथालय प्रशिक्षण

ग्रंथालय प्रशिक्षण
Published on

ग्रंथालय परिचयाचे
‘नातू’येथे प्रशिक्षण
चिपळूण : तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्यावतीने नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय वाचक प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्‍घाटन प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव यांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या वेळी प्राचार्य डॉ. यादव यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन ग्रंथालयाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच ग्रंथालयातील ओपीएसी प्रणालीचा वापर करून आवश्यक पुस्तकांचा शोध कसा घ्यावा, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या डिजिटल युगात ग्रंथालयाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानात भर घालावी, असे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल अनिल कांबळे यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे महत्त्व, ग्रंथालयाचे नियम, रचना व संघटन, सभासदत्व, उपलब्ध सुविधा, विविध ग्रंथालयीन सेवा, उपक्रम व आगामी कार्यक्रम यांची सविस्तर माहिती दिली.

नेत्रावतीच्या थांब्यास
तीन वर्षे पूर्ण
संगमेश्वर : संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकावर नेत्रावती एक्सप्रेसला थांबा मिळून 22 ऑगस्टला तीन वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे’ फेसबुक ग्रुपच्यावतीने स्थानकात एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून गाडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. हा थांबा संगमेश्वर तालुक्यातील विद्यार्थी, नोकरदार, पर्यटक, व्यावसायिक आणि चाकरमान्यांसाठी अत्यंत सोयीचा व महत्त्वाचा ठरला आहे. वर्षपूर्तीनिमित्त स्थानकात आलेल्या नेत्रावती एक्सप्रेसला हार घालून पूजा करण्यात आली. तसेच गाडीच्या लोको पायलटचा सत्कार करण्यात आला. या वेळी ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन, गणपत दाभोलकर, नीतेश मालप, इशांत जिमन, आरूष मालप आणि पुष्कर गीते उपस्थित होते.

दापोलीत
‘राष्ट्ररक्षाबंधन’ उपक्रम
गावतळे ः सीमेवरील सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दापोली तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या राख्या आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टचे सदस्य प्रा. संदीप वारके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, गावतळे येथे माजी सैनिक लीलाधर कालेकर व संदीप सावंत यांच्या हस्ते या राख्या सोपवण्यात आल्या. या स्तुत्य ‘राष्ट्ररक्षाबंधन’ उपक्रमाचे हे सलग 20वे वर्ष आहे. यंदाही विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आणि घरून आणलेल्या राख्या जवानांसाठी मोठ्या उत्साहाने जमा केल्या. या उपक्रमात गावतळे हायस्कूलसह मळे, साखळोली क्र. 1, इनामपांगारी क्र. 1, कोळबांद्रे क्र. 1 आणि भौजाळी यांनी सहकार्य केले. या प्रसंगी प्राचार्या भक्ती सावंत उपस्थित होत्या.


आयटीआयमध्ये
प्रवेशप्रक्रिया सुरू
रत्नागिरी ः स्थानिक राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील (मुलींची) प्रवेशप्रक्रिया 24 ऑगस्टपासून पुनश्च सुरू करण्यात आली आहे. इच्छुक महिला उमेदवारांनी 31 पर्यंत या संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे. व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून तत्काळ रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्यावा. संस्थेमध्ये विद्यार्थिनींसाठी सुसज्ज वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय प्रशिक्षणार्थींना नियमानुसार दरमहा 500 रुपये विद्यावेतन दिले जाते. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमानुसार 10वी व 12वी समकक्षता प्रमाणपत्रही प्रदान केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com