

- rat२४p२६.jpg-
P26O59374
रत्नागिरी ः निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना निवेदन देताना कृषी महासंघाचे जिल्हा पदाधिकारी.
----
कृषी आकृतिबंधाविरोधात एल्गार
काळ्या फितीने निषेध ; अन्यथा कामबंद आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ ः महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने प्रस्तावित केलेला अतांत्रिक आकृतिबंध शेतकरी आणि तांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या हितास बाधा पोहोचवणारा आहे. त्यामुळे हा आकृतिबंध पूर्णतः रद्द करून तज्ज्ञ समितीमार्फत नवीन शेतकरी केंद्रित आकृतिबंध तयार करावा. मागण्या मान्य न झाल्यास ४ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करू, असा इशारा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाने दिला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाच्या रत्नागिरी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाविषयीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना देण्यात आले. विद्यमान प्रस्तावित आकृतिबंधात केवळ किरकोळ बदल करून तोच कायम ठेवण्याचा प्रयत्न शासनस्तरावर सुरू आहे. अशा स्वरूपाची तात्पुरती मलमपट्टी न करता हा आकृतिबंध पूर्णपणे रद्द करण्यात यावा त्याऐवजी कृषिक्षेत्राचा अनुभव असलेल्या सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संघटनांचे प्रतिनिधी आणि अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश असलेली नवीन ‘तज्ज्ञ समिती’ गठित करावी, अशी ठाम मागणी पत्रात करण्यात आली आहे. या कामबंद आंदोलनाला महाराष्ट्र राज्य साहाय्यक कृषी अधिकारी संघटना, उपकृषी अधिकारी संघटना, कृषी अधिकारी संघटना व राजपत्रित अधिकारी संघटनांसह सर्व घटक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आज जिल्ह्यातील सर्व कृषी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. आंदोलनाच्या पुढील टप्प्यात २७ रोजी शासकीय व्हॉटस् ॲप ग्रुपमधून बाहेर पडणे, २८ रोजीपासून रात्री उशिरापर्यंत काम करणे बंद, ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत लेखणी बंद आंदोलन व सर्व शासकीय बैठका, रिपोर्टिंगवर बहिष्कार, २ ते ३ सप्टेंबर रोजी सामूहिक रजा आंदोलन आणि जिल्हा व आयुक्तालय स्तरावर ठिय्या आंदोलन तर ४ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन केले जाणार आहे.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.