

swt252.jpg
59512
सिंधुदुर्गनगरी : ''आम्ही साहित्यप्रेमी''च्या वतीने आयोजित ''श्रावणधारा'' कविसंमेलनास उपस्थित मान्यवर.
धामणस्कर यांनी कवितेचे मर्म जपले
काव्यप्रेमींचा सुर ः सिंधुदुर्गनगरीत काव्यसंमेलनास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २५ : ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांच्या निधनाने शब्दांचे मर्म जाणणाऱ्या संवेदनशील आणि ऋजू व्यक्तिमत्त्वाच्या कवीला मराठी काव्यविश्व मुकले आहे, अशा शब्दांत ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या कविसंमेलनात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. धामणस्कर यांना समर्पित या कविसंमेलनात १५ कवींनी विविध विषयांवरील कविता सादर केल्या. त्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या अठराव्या मासिक कार्यक्रमानिमित्त सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे ‘श्रावणधारा’ कविसंमेलन आयोजित केले होते. व्यासपीठावर सतीश लळीत, ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे आणि कवी सुरेश पवार उपस्थित होते.
लळीत यांनी धामणस्कर यांच्या साहित्यिक प्रवासाचा आढावा घेतला. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या धामणस्कर यांनी उपजीविकेसाठी रिझर्व्ह बँकेत नोकरी केली; मात्र कविता हीच त्यांची खरी जीविका होती. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली. अल्पावधीतच त्यांच्या कवितांना ‘सत्यकथा’, ‘मौज’, ‘कविता-रती’ यांसारख्या दर्जेदार वाङ्मयीन नियतकालिकांत स्थान मिळाले. धामणस्कर यांनी मोजके; पण समृद्ध काव्यलेखन केले. ‘प्राक्तनाचे संदर्भ’, ‘बरेच काही उगवून आलेले’ आणि ‘भरून आलेले आकाश’ या त्यांच्या काव्यसंग्रहांना रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. त्यांचे निधन हा मराठी साहित्य विश्वासाठी मोठा धक्का असल्याचे लळीत यांनी सांगितले.
श्रद्धांजली कार्यक्रमानंतर कविसंमेलनाला सुरुवात झाली. संध्या तांबे, डॉ. सई लळीत, सुरेश पवार, पुरुषोत्तम लाडू कदम, सुधीर गोठणकर, मधुकर जाधव, नम्रता रासम, प्रगती पाताडे, मनोहर सरमळकर, मिताली मुळीक, मनीषा पाताडे, सीमा मसुरेकर, सुस्मिता राणे, आर्या बागवे आणि अपर्णा जोशी यांनी कविता सादर केल्या. प्रिया आजगावकर, डॉ. संदीप नाटेकर, डॉ. प्रतिमा नाटेकर, विष्णुप्रसाद दळवी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.