चिपळूणमध्ये 800 विद्यार्थ्यांची फेरी

चिपळूणमध्ये 800 विद्यार्थ्यांची फेरी
Published on

‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमात
चिपळूणमध्ये ८०० विद्यार्थ्यांची रॅली
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शहरात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित करणारा उपक्रम राबवण्यात आला. परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल, प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालय, शिशुविहार आणि गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक राखी सैनिकांसाठी’ ही संकल्पना घेऊन ८०० विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली.
युनायटेड इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वारापासून सुरू झालेली ही फेरी चिपळूण मुख्य पोस्ट ऑफिसपर्यंत देशभक्तिपर घोषणानिनादात पार पडली. या उपक्रमाची सुरुवात सरस्वती देवी व भारत मातेच्या पूजनाने झाली. या वेळी संस्थेचे पदाधिकारी, आजी-माजी सैनिक, त्यांच्या सुविद्य पत्नी, शिक्षक व पत्रकार उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन, ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’च्या गगनभेदी घोषणा दिल्या. दहावीच्या विद्यार्थ्यांनी रॅलीवर पुष्पवृष्टी केली. सीमेवर कार्यरत असलेल्या भारतीय जवानांसाठी विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केलेल्या राख्या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पाठवण्यात आल्या. ज्या विद्यार्थ्यांचे वडील सैन्यात कार्यरत आहेत, त्यांच्या युनिटच्या पत्त्यावरही राख्या पाठवण्यात आल्या. पोस्ट ऑफिस परिसरात एनसीसीच्या विद्यार्थिनींनी उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांचे औक्षण करून त्यांना राख्या बांधल्या.
या प्रसंगी नगराध्यक्ष उमेश सपकाळ, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे आणि नगरसेवकांच्या हस्ते राख्यांची पाकिटे पोस्टमास्तर भोपळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. प्रांताधिकारी लिगाडे यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध रॅलीचे कौतुक करत हा उपक्रम राष्ट्रप्रेम व मूल्यशिक्षण देणारा असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com