गणेशोत्सवासाठी नांदेड-कोकण विशेष रेल्वे हवी

गणेशोत्सवासाठी नांदेड-कोकण विशेष रेल्वे हवी
Published on

नांदेड-कोकण थेट रेल्वेसाठी पाठपुरावा
कोकण विकास समितीचे निवेदन ; गणेशोत्सवात लाभदायक
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २६ : गणेश उत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नांदेड आणि कोकणातील चिपळूण, रत्नागिरी किंवा सावंतवाडी दरम्यान विशेष रेल्वेगाडी सुरू करावी, अशी मागणी कोकण विकास समितीने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. याबाबत जयवंत शंकर दरेकर आणि अक्षय मधुकर महापदी यांनी दक्षिण मध्यरेल्वे आणि कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
गणेशोत्सवात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. नांदेड, मराठवाडा तसेच लगतच्या भागांतून कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मर्यादित असल्याने त्यांना अनेक गाड्यांचा आधार घेत प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ, पैसा आणि प्रवासाचा त्रास वाढतो. नांदेडहून थेट गणपती विशेष रेल्वे सुरू झाल्यास या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे समितीने म्हटले आहे. परिचालनाची व्यवहार्यता, मार्गावरील क्षमता आणि रेकची उपलब्धता लक्षात घेऊन चिपळूण, रत्नागिरी किंवा सावंतवाडी रोड यापैकी योग्य ठिकाणाला गाडीचे टर्मिनल करण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. नांदेडहून कोकणाकडे जाणारी सेवा १०, ११, १२, १३, १७, १८, १९ आणि २० सप्टेंबर रोजी तर कोकणातून नांदेडकडे परतीची सेवा ११, १२, १३, १४, १८, १९, २० आणि २१ सप्टेंबर रोजी चालवण्याची मागणी करण्यात आली आहे. दक्षिण मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक, नांदेड विभागाचे डीआरएम, मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक, पुणे व भुसावळ विभागाचे डीआरएम, मुंबई विभागाचे डीआरएम तसेच कोकण रेल्वेच्या सीएमडींनी या प्रस्तावाची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागांशी समन्वय साधावा आणि गणपती विशेष रेल्वेची घोषणा लवकर करावी, अशी कोकण विकास समितीची मागणी आहे.
--
हे आहेत दोन पर्याय
* नांदेड–पूर्णा–परभणी–परळी वैजनाथ–लातूर रोड–कुर्डूवाडी–पुणे–पनवेल–चिपळूण-रत्नागिरी-सावंतवाडी रोड.
* नांदेड–परभणी–जालना–छत्रपती संभाजीनगर–मनमाड–कल्याण–पनवेल–चिपळूण/रत्नागिरी/सावंतवाडी रोड असा आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com