द्रोण-पत्रावळी विक्रीतून उभारला स्वयंरोजगार

द्रोण-पत्रावळी विक्रीतून उभारला स्वयंरोजगार
Published on

- rat२७p६.jpg-
P26O59956
संगमेश्वर ः मशिनवर पत्रावळी बनवताना अनिकेत.
---
कौशल्याच्या जोरावर गावातच घेतली ‘भरारी’

द्रोण-पत्रावळी व्यवसायातून अनिकेतने उभा केला आदर्श

सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २७ ः हातात कौशल्य, मनात जिद्द आणि अपार कष्ट करण्याची तयारी असेल तर रोजगारासाठी गाव सोडून शहरात जाण्याची गरज नाही, हे गोळवली (ता. संगमेश्वर) येथील तरुण अनिकेत किंजळकर याने कृतीतून सिद्ध केले आहे. पदवी किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बहुतांश तरुण नोकरीच्या शोधात मुंबई-पुण्यासारख्या महानगरांकडे धाव घेतात; मात्र अनिकेतने या पारंपरिक वाटेला फाटा देत द्रोण-पत्रावळी निर्मितीचा पर्यावरणपूरक व्यवसाय सुरू केला आहे. आपल्या कष्टाच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभे राहत त्याने ग्रामीण भागातील तरुणांसमोर स्वयंरोजगाराचा एक नवा आणि वस्तुनिष्ठ आदर्श निर्माण केला आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात सरकारी किंवा खासगी नोकरी मिळवणे कठीण झाले आहे. अशा वेळी परिस्थितीला दोष देत बसण्याऐवजी ‘आपणच आपल्यासाठी आणि इतरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या,’ असा ठाम निर्धार अनिकेतने केला. ग्रामीण भागातील गरजा आणि बाजारपेठेचा अभ्यास करून त्याने द्रोण व पत्रावळी बनवण्याचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोणताही नवा उद्योग सुरू करताना सुरुवातीचा काळ खडतर असतो. अनिकेतलाही सुरुवातीला अत्याधुनिक यंत्रसामग्रीची जुळवाजुळव, कच्चा माल, योग्य बाजारपेठ शोधणे आणि ग्राहक मिळवणे अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागला; मात्र, खचून न जाता त्याने कामातील गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला. हळूहळू त्याच्या उत्पादनाचा दर्जा पाहून ग्राहकांचा विश्वास बसू लागला. आज परिसरातील विविध धार्मिक कार्यक्रम, सण-समारंभ, लग्नकार्ये आणि सार्वजनिक भोजनाच्या कार्यक्रमांसाठी त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर द्रोण आणि पत्रावळींना मागणी होत आहे. केवळ नोकरीच्या संधींची वाट पाहत बसण्यापेक्षा आपल्या परिसरात उपलब्ध असलेली साधने, स्थानिकांची गरज आणि स्वतःमधील कौशल्य ओळखून तरुणांनी छोटे-मोठे गृहउद्योग सुरू करावेत, असा संदेश अनिकेत याने दिला आहे.
---
पर्यावरणपूरक व्यवसायास
द्रोण आणि पत्रावळी ही महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीची मूळ ओळख आहे. आजच्या काळात प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापरावर बंदी तसेच पर्यावरणाविषयी वाढलेली जागृती यामुळे नैसर्गिक पत्रावळींची मागणी कमालीची वाढली आहे. अनिकेतने या संधीचे सोने केले आहे. कष्टाची लाज न बाळगता कोणतेही काम छोटे वा मोठे नसते, या विचाराने तो स्वतः राबतो आणि कुटुंबाला आर्थिक हातभार लावतो.
---

-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com